भूमी अभिलेखच्या सहायकाने स्वीकारली 70 हजारांची लाच

एसीबीने रंगेहाथ पकडले

कुरखेडा : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायकाला 70 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. रविंद्र सदाशिव दिनकोंडावार (42 वर्षे) असे त्या वर्ग-2 अधिकाऱ्याचे नाव आहे.

एसीबीकडून प्राप्त माहितीनुसार, दिनकोंडावार यांनी एका शेतजमिनीचा पोटहिस्सा मोजणी करून सातबारा वेगळा करून देण्यासाठी चलान काढून देण्यासाठी संबंधित तक्रारदाराला 1 लाख रुपयांची मागणी केली होती. यादरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडविरोली येथील अधिकाऱ्यांना भेटून तकार नोंदविली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने दि.5 रोजी रोजी पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. दिनांक 6 आॅगस्ट रोजी तडजोडीअंती 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दिनकोंडावार यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

यात एसीबीचे पोलीस उपअधीक्षक चंद्शेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पो.नि. संतोष पाटील व चमुने तक्रारीची गोपनियरित्या पडताळणी करून ही कारवाई केली. याप्रकरणी कुरखेडा पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स.फौ. सुनील पेद्दीवार, हवालदार राजेश पदमगिरीवार, किशोर जौजारकर, स्वप्निल बांबोळे, पो.अं. संदीप उडान, संदीप घोरमोडे, प्रविण जुमनाके, हितेश जेट्टीवार, मपोअं विद्या मशाखेत्री, जोत्सना वसाके व चापोहवा राजेश्वर कुमरे, चापले यांनी केली.

गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडविरोली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपधीक्षक चंद्रशेखर ढोले यांनी केले आहे.