अभियंत्यापाठोपाठ मंडळ अधिकारी आणि तलाठीही अडकले एसीबीच्या जाळ्यात

महसूल सप्ताहातच वैयक्तिक महसूलवसुली

गडचिरोली : बांधकाम विभागाच्या एका कनिष्ठ अभियंत्याच्या लाचखोरीच्या घटनेची चर्चा संपत नाही तोच दुसऱ्या दिवशी एक मंडळ अधिकारी आणि तलाठीही एसीबीच्या जाळ्यात अडकले. खमनचेरू येथील मंडळ अधिकारी आणि महागावच्या तलाठ्याला 6 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पकडले. एकीकडे महसूल सप्ताह साजरा केला जात असताना महसूल कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख सेवा देण्याऐवजी वैयक्तिक महसूल वसुली करण्याचा हा प्रकार चर्चेचा विषय होत आहे.

तीन हिस्सेदारांच्या शेतजमीनीचे फेरफार करून सात-बारावर नाव चढविण्याकरीता महागाव (साजा क्र.10) येथील तलाठी व्यंकटेश सांबय्या जल्लेवार (40 वर्ष) आणि खमनचेरू येथील मंडळ अधिकारी भुषण जवंजाळकर यांनी 9 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार एका शेतकऱ्याने केली होती. तडजोडीअंती प्रत्येकी 3 हजार असे 6 हजार रुपये घेण्यास ते तयार झाल्याची पडताळणी केल्यानंतर प्रत्यक्ष ती लाच घेताना एसीबीच्या पथकाने पकडले. त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल केला जात असल्याचे एसीबी कार्यालयाने कळविले. यानंतर आरोपींच्या घरांचीही झडती घेण्यात आली. त्यात काय आढळले याचा तपशिल कळू शकला नाही.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पो.नि. शिवाजी राठोड, स.फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, किशोर जौंजारकर, अंमलदार प्रविण जुमनाके आदींनी केली.