पोलिसांच्या अंगावर वाहन चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

दारू तस्करांचा सिनेस्टाईल पाठलाग

गडचिरोली : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातून महिंद्रा पीकअप या मालवाहू वाहनातून मोठ्या प्रमाणात दारूची खेप घेऊन येणाऱ्या दारू तस्कर अजय चिचघरे यांच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चक्क गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर त्या वाहन चालक आणि सहकाऱ्याला पोलिसांनी नागपुरातून शोधत त्यांच्या मुसक्या आवळल्या.

प्राप्ता माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड हे कर्तव्यावर असताना त्यांना अजय चिचघरे हा दारु विक्रेता त्याच्या सहकाऱ्यांमार्फत दारूची खेप चंद्रपूर जिल्ह्यातून आणत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी महिंद्रा पिक अप वाहन क्रमांक एमएच- 36, टी-2449 चा चालक गौरव कोडाप याने पोलिसांचा आदेश धुडकावून वाहन न थांबविता भरधाव वेगाने वाकडी-सेमाना मार्गे पळविले. त्यामुळे सपोनि राहुल आव्हाड यांनी त्यांच्या सोबतच्या पोलीस पथकासह शासकीय वाहन क्रमांक एम.एच. 33, ए.सी. 6489 याने पाठलाग सुरु केला.

अंदाजे 30 ते 35 किलोमीटर पाठलाग केल्यानंतर वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील दारुने भरलेले वाहन थांबविले. पोलीस पथकाने चालक व वाहनास ताब्यात घेण्याच्या उद्देशाने वाहनातून उतरून दारूने भरलेल्या त्या वाहनाकडे जात असताना दारू तस्करांच्या वाहनाचा चालक गौरव धामदेव कोडाप याने पु्न्हा शिवीगाळ करून ‘आज तुम्हे कुचल डालेंगे’ असे म्हणून आपले वाहन रिव्हर्समध्ये भरधाव वेगाने पोलिस पथकाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी प्रसंगावधान राखत आपला बचाव करून रस्त्याच्या कडेला उडी घेतल्याने त्यांना दुखापत झाली नाही, परंतु शासकिय वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून ते क्षतीग्रस्त झाले. याचाच फायदा घेवून आरोपी हे घटनास्थळावरून दारुने भरलेले त्यांच्या ताब्यातील पिकअप वाहन घेवून जंगलमार्गे पसार झाले.

यासंदर्भात गडचिरोली पोलीस स्टेशनला आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शासकिय कामात अडथळा या सदराखाली गुन्हा नोंद करण्यात आला. तपास अधिकारी भगतसिंग दुलत यांनी माहिती घेतली असता ते आरोपी नागपूरला पळून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे वरिष्ठांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने नागपुरात लपून बसलेल्या आरोपी गौरव धामदेव कोडाप, रा.बोदली, ता.जि.गडचिरोली आणि प्रणय सुधीर पंदिलवार, रा.काटली, ता.जि.गडचिरोली यांना दि.11 ला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. उल्हास भुसारी, सपोनि.भगतसिंग दुलत, पोहवा सतीश कत्तीवार, प्रेमानंद नंदेश्वर, अकबर पोयाम, राकेश सोनटक्के, अंमलदार श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, शुक्राचारी गवई व उमेश जगदाळे यांनी पार पाडली.