गडचिरोली : आरमोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोलांडीनाल्याच्या बंधाऱ्याचे पाणी अडविण्यासाठी लावलेल्या वजनदार लोखंडी प्लेट चोरट्यांनी पळविल्या होत्या. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक करत 2.35 लाखांच्या प्लेट्स जप्त केल्या आहेत. प्रतिनग तब्बल 100 किलो वजन असलेल्या या लोखंडी प्लेट चोरून नेण्यासाठी अनेकांची मदत घ्यावी लागली असणार. त्यामुळे लवकरच इतरही आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी आरमोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वसा (ता.गडचिरोली) येथील कोलांडी नाल्याच्या बंधाऱ्यामधील पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 17 नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) व त्यापासून 500 मीटर अंतरावरील 30 नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) (अंदाजे किंमत 2,35,000 रुपये) अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला होता. त्यावरुन आरमोरी पोलिसांनी कलम भा.न्या.सं. 303 (2) अन्वये गुन्ह्रांची नोंद केली होती.
या चोरीचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे करीत असताना अशाच प्रकारचा गुन्हा पोलीस स्टेशन वरुड जि.अमरावती येथे झालेला असून त्या गुन्ह्यामधील आरोपी अटकेत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे वरूड पोलिसांकडे संपर्क करून आरोपी कुलदिपसिंग दर्शनसिंग जुणी (27 वर्ष), रा.बिडगांव चेरी कंपनीजवळ, नागपूर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने कोलांडी नाल्याच्या बंधाऱ्यातील दोन्ही ठिकाणांवरील लोखंडी प्लेट्स (पल्ले) चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
सदर आरोपीकडून 2.05 मीटर लांब आणि 0.5 मीटर रुंद असणाऱ्या 30 नग लोखंडी प्लेट्स (अंदाजे किंमत 1,50,000 रु.) तसेच 2.15 मीटर लांब व 0.5 मीटर रुंद असणाऱ्या 17 नग लोखंडी प्लेट्स (अंदाजे किंमत 85,000 रु.) असा एकूण 2 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या आरोपीस 30 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पण या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध लावण्यात अद्याप यश आलेले नाही.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, आरमोरीचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे, हवालदार विशाल केदार, अंमलदार सुरेश तांगडे, हंसराज धस यांनी केली.