येनापूरच्या दोन घरफोडीतील आरोपीला पोलिसांकडून अटक

चोरलेले सोने व रक्कम जप्त

गडचिरोली : आष्टी पोलीस स्टेशनअंतर्गत येनापूर येथे गेल्या 27 जुलै रोजी घरफोडी करणा­ऱ्या आरोपीचा शोध लावलण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून चोरीतील सर्व ऐवज जप्त करण्यात आला आहे.

येनापूर येथील मायाबाई माधव अलचेट्टीवार सकाळी घराला कुलूप लाऊन शेतावर रोवण्याकरीता गेल्या असताना आरोपीने घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख 15 हजार, एक तोळ्याची सोन्याची पोत लंपास केली होती. तसेच घराशेजारी राहणारे विस्तारी नागन्ना मेकर्तीवार यांच्याही घराचे कुलूप तोडून टिनाच्या पेटीमध्ये ठेवलेले रोख 10 हजार रुपये आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल आरोपीने चोरुन नेला होता.

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात दोन वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली होती. गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक पुराव्याच्या मदतीने अज्ञात आरोपीचा अत्यंत शिताफीने शोध घेऊन निकेश देविदास मेश्राम (28 वर्षे), रा.लखमापूर बोरी, ता.चामोर्शी, ह.मु. वंजारी मोहल्ला, गडचिरोली याला अटक केली. त्याच्याकडून चोरीतील मुद्देमालही जप्त करण्यात आला. पुढील तपास पोउपनि.गोकुलदास मेश्राम करीत आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टीचे प्रभारी अधिकारी पोनि.विशाल काळे, पोउपनि.गोकुलदास मेश्राम, हवालदार रतन रॉय, भाऊराव वनकर, अंमलदार रविंद्र मेदाळे, संतोष श्रीमनवार यांनी पार पाडली.