एसटी चालकावर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला दोन वर्षाचा कारावास

रस्त्यात बस अडवून केली दादागिरी

गडचिरोली : आपली दुचाकी रस्त्यात बंद पडली असताा ती बाजुला घेण्याऐवजी एसटी बसचा रस्ता अडवून चालकाशी दादागिरी करणे, एवढेच नाही तर चाकूने हल्ला करणे एका दुचाकीस्वाराला महागात पडले. जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी त्या आरोपीला दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सुनील कोहपरे असे त्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, एसटी बस चालक प्रविण विश्वनाथ तलांडे, हे 9 मार्च 2019 रोजी वाहक रविंद्र सुधाकर पुज्जलवार यांच्यासह प्रवाशांना घेऊन भेंडाळा, गणपूर मार्गे गोंडपिपरी येथे मुक्कामी जात असताना लोकमान्य टिळक विद्यालय गणपूर या शाळेसमोर बोरी-गणपूर जाणा­ऱ्या मार्गावर सुनील कोहपरे हा इसम बसच्या मार्गावर मध्यभागी आपली दुचाकी उभी ठेवून होता. चालकाने विचारले असता “माझी गाडी बंद पडली आहे, मी काढू शकत नाही” असे म्हणून तो अरेरावी करुन शिविगाळ करत होता. त्यामुळे एसटी चालकाने खाली उतरून त्याची दुचाकी बाजुला करण्याचा प्रयत्न केला असताना आरोपी कोहपरे याने बस चालकाची कॉलर पकडून शिविगाळ करत खिशातून चाकू काढून वार करण्याचा प्रयत्न केला. यात चाकू त्यांच्या उजव्या मांडीवर लागला.

चामोर्शी पोलिसांनी याप्रकरणी बस चालक प्रवीण तलांडे यांच्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार गुन्हा नोंद करुन आरोपीला अटक केली होती. या प्रकरणाचा न्यायनिवाडा करताना न्या.विनायकजोशी यांनी आरोपी सुनील जनार्धन कोहपरे, रा.गणपूर, याला दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम कारावास आणि 20 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम जखमी बस चालकाला देण्याचा आदेश दिला.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहा.जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले.