धान घोटाळ्यातील आरोपी अजूनही मोकाट, अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न

बावणे, मेश्राम यांचा पोलिसांना गुंगारा?

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील देऊळगावच्या बहुचर्चित धान घोटाळ्यात तथ्य आढळल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार 17 लोकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र त्यातील केवळ 2 आरोपी पोलिसांच्या हाती लागले. मुख्य आरोपी असलेले उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीभर बावणे आणि देऊळगाव आ.वि.का.संस्थेचे सचिव महेंद्र मेश्राम यांना अद्यापही अटक झालेली नाही. सराईत गुन्हेगारांना अवघ्या काही तासांत शोधून काढणाऱ्या पोलिसांना हे आरोपी का सापडत नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान बावणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांना त्यात यश येणार नाही, असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे आदिवासी विकास महामंडळाने बावणे यांना निलंबित करून त्यांचे निलंबन काळातील मुख्यालय नंदूरबार येथे ठेवले. जवळपास तीन आठवड्यांपासून बावणे गायब आहेत.

या चार कोटींच्या धान घोटाळ्यात बावणे आणि मेश्राम हे मुख्य आरोपी असल्याने त्यांना आधी अटक करणार अशी भूमिका तपास यंत्रणेने घेतली होती. मात्र तरीही त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

याप्रकरणी मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. कडक भूमिका घेऊन कारवाईचे आदेश देणाऱ्या यंत्रणेकडून आता पुढे काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.