कुरखेडा : पती दारूच्या नशेत येऊन चारित्र्यावर नेहमी संशय घेत असल्याने पत्नीने रागाच्या भरात पतीच्या डोक्यावर प्रहार करून त्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली पत्नीला अटक केली होती. या बहुचर्चित खून घटल्यातील आरोपी पत्नीला अखेर गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिड वर्षानंतर जामीन मंजूर केला. आरोपी महिलेच्या वतीने अॅड.आयेशा शेखानी यांनी युक्तिवाद केला.
तालुक्यातील खरकाडा येथे 15 जून 2024 रोजी घडलेल्या या बहुचर्चित घटनेत सुरूवातीला अविनाश आकरे यांच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली होती. मात्र एक महिन्यानंतर त्यांचा खून पत्नी कोमल (32 वर्ष) हिनेच केल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
अविनाश हा मद्यच्या आहारी जाऊन पत्नी कोमल हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करत होता. घटनेच्या दिवशी झालेल्या भांडणात पती अविनाशने मारहाण केली, यात कोमलच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडल्याने तिने रागाच्या भरात पती अविनाशवर लाकडी पाटीने हल्ला केला आणि डोक्यावर गंभीर दुखापत होवून मोठा रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला, असा निष्कर्श काढण्यात आला होता. त्यामुळे कोमलला अटक झाली होती.
या घटनेचा कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने, आरोपी कोमल हिचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याने आणि त्यांना दोन लहान मुली असल्याने त्यांना जामीन मिळावा, अशी मागणी कोमलच्या वतीने अॅड.आयेशा शेखानी यांनी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून काही अटींसह कोमलला जामीन मंजूर केली.
खुनाचा गुन्हा हा गैरजमानती गुन्हा मानला जातो. त्यामुळे या गु्न्ह्यात जमानत मिळणे सामान्यतः कठीण असते. तरीही, विशिष्ट परिस्थिती आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे, असे निरीक्षकांचे मत आहे.