धान घोटाळ्यातील फरार मॅनेजर महेंद्र मेश्राम पोलिसांच्या ताब्यात

सहा महिन्यानंतर केली अटक

कुरखेडा : तालुक्यातील देऊळगावच्या 4 कोटी रुपयांच्या धान खरेदी घोटाळा प्रकरणात जवळपास सहा महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी आणि देऊळगाव आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचा व्यवस्थापक महेंद्र इस्तारी मेश्राम याला शेवटी कुरखेडा पोलिसांनी अटक केली. मेश्राम यांच्या अटकेमुळे या प्रकरणातील तपासाला गती येईल. फरार होण्यापूर्वी मेश्राम यांनी आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्यावर केलेले आरोप चर्चेत आले होते. त्यातून बावणे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.

या धान घोटाळा प्रकरणात कुरखेडा पोलिसांनी मुरलीधर बावणे, दोन कर्मचारी, संस्थाध्यक्ष आणि इतर संचालकांसह एकूण 17 जणांवर गुन्हा दाखल केला होता. बावणे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता, तर संस्थेच्या अध्यक्षा आणि काही महिला संचालकांना न्यायालयीन कोठडीत तुरुंगवास भोगावा लागला. सध्या अध्यक्षा आणि सर्व संचालक जामिनावर बाहेर आहेत. आता मेश्राम यांच्या अटकेमुळे या प्रकरणातील नवीन खुलासे काय समोर येतात याकडे सर्वांची लक्ष राहणार आहे.

बनावट कागदपत्रे, खरेदीच्या नोंदींमध्ये फेरफार आणि शासकीय निधीचा अपहार यासारख्या गंभीर अनियमिततांमुळे स्थानिक शेतकरी आणि आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात व्यवस्थापक महेंद्र मेश्राम यांचा प्रमुख सहभाग असल्याचे तपासात समोर आले होते. मेश्राम यांनी धान खरेदी केंद्रावर बनावट बिले तयार करणे, शेतकऱ्यांच्या नावाने जास्त खरेदी दाखवणे आणि निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. दरम्यान मेश्राम यांनी या घोटाळ्यासाठी उपव्यवस्थापक बावणे जवाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या अटकेनंतर हे आरोप पुन्हा तपासाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.