प्रेमप्रकरणातून झालेल्या हत्येतील मारेकरी वर्षभरानंतरही मोकाट !

युवकाच्या मातेेची न्यायासाठी फरफट

गडचिरोली : वर्षभरापूर्वी आरमोरी तालुक्यातील बोळधा गावातील युवकाची प्रेमप्रकरणातून दोरीने गळा आवळून हत्या झाली. पोलिसांनी हत्येचा गुन्हाही दाखल केला. पण हत्या करणाऱ्या आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. मारेकऱ्यांनी पैशाच्या जोरावर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मृत युवकाच्या आईसह काकांनी केला आहे. या जगात फक्त पैसेवाल्यांनाच न्याय मिळतो का? माझ्या मृत मुलाला न्याय मिळणारच नाही का? असे आर्जव मृत युवकाची आई मुक्ताबाई उरकुडे यांनी सोमवारी पत्रकारांपुढे केले.

मृत युवक प्रशांत रामदास उरकुडे याची आई मुक्ताबाई, मोठे वडील अमृत उरकुडे, काका सुभाष उरकुडे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची हकिकत सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रशांत याचे गावातील एका युवतीशी प्रेमसंबंध होते. पण याची कुणकुण लागल्याने मुलीच्या काकांनी (वडील हयात नाही) दुसऱ्या युवकाशी तिचे लग्न जुळवले होते. एवढेच नाही तर प्रशांतच्या मोठ्या वडीलांना धमकी देऊन पुतण्याला सांभाळा, नाहीतर त्याला मारून टाकू, अशी धमकीही दिली होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यादरम्यान दि.17 एप्रिल 2024 रोजी रात्री गावात रामनवमीची मिरवणूक सुरू असताना प्रेयसी मुलीने प्रशांतला फोन करून गावाबाहेर भेटण्यासाठी बोलवले होते. त्यांचे संभाषण प्रशांतच्या आईने ऐकल्यानंतर तिने त्याला बाहेर जाण्यासाठी रोखले होते. कारण मुलीच्या काकांची धमकी तिला आठवत होती. पण रात्री आई झोपी गेल्यानंतर तो घराबाहेर पडला तो आलाच नाही. शोधाशोध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशांतचा मृतदेह विजय मुखरूजी राऊत यांच्या शेतात आढळला. त्याच्या गळ्याला दोरीचे तीन वेढे देऊन आवळले होते. शिवाय अंगात शर्टही नव्हता. त्यामुळे दोन ते तीनच्या संख्येत असलेल्या आरोपींनी त्याची दोराने गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट दिसत होते.

तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असल्याने त्यावेळी आरमोरी पोलिसांचे खुनाच्या तपासाकडे थोडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर तत्कालीन तपास अधिकाऱ्यांची बदलीही झाली. पुढे या प्रकरणाचा तपास गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्याकडे देण्यात आला. घटनास्थळावरून जप्त केलेल्या साहित्याचा फॅारेन्सिक रिपोर्ट अद्याप मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतर या खुनाचे धागेदोरे हाती लागू शकतात. केवळ संशयाच्या आधारावर कोणाला ताब्यात घेता येत नाही, असे एसडीपीओ जगताप यांनी स्पष्ट केले. दरम्यान मृत युवकाचे नातेवाईक प्रत्येक महिन्याला पोलीस स्टेशनला, एसडीपीओ यांच्याकडे जाऊन तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी करत आहेत.

मृत्यूनंतरचे फोटो मृताच्याच मोबाईलमधून पाठवले

या हत्येनंतर मृत युवक प्रशांत उरकुडे याच्या मृतदेहाचे फोटो त्या्च्याच मोबाईलमधून मुलीच्या नातेवाईकांना पाठविण्यात आले आणि नंतर तो मोबाईल बंद करून ठेवला होता. वास्तविक प्रशांतच्या मोबाईलचे स्क्रिन लॅाक कसे उघडायचे हे त्याच्या एका मित्राशिवाय कोणालाही माहित नव्हते. त्यामुळे या हत्येसाठी त्या मित्राचेही सहकार्य आरोपींनी घेतले नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

कॅाल हिस्ट्री गायब असल्याचा संशय

विशेष म्हणजे मृत प्रशांत उरकुडे याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र त्यातील काही कॅालची हिस्ट्री गायब असल्याची शंका प्रशांतच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. वास्तविक त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढून या हत्येतील आरोपींचा माग काढणे पोलिसांसाठी कठीण काम नव्हते, पण पोलिसांनी आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही, असे नातेवाईकांनी स्पष्ट केले.

याप्रकरणी कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची भेट घेतली असून त्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा शब्द नातेवाईकांना दिला आहे.