गडचिरोली : सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन चालवून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाला न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला 2 वर्षांचा कारावास आणि 30 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. केवळराम येलोरे (पो.स्टे.आरमोरी) असे या घटनेत मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
लोकसभा निवडणूक 2019 दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आरमोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावली होती. यादरम्यान दि.16 मार्च 2019 च्या रात्री आरमोरी ते गडचिरोली मार्गावरील सोनू धाब्यासमोर सपोनि महारूद्र परजने व नापोशि गोपाल जाधव यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची ड्युटी लावलेली होती. रात्री 1 वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक अजित राठोड यांच्यासह एएसआय सुधाकर मनबत्तुलवार, नापोशि केवळराव येलोरे व इतर कर्मचारी तिथे शासकीय वाहनातून पोहोचले. नापोशि येलोरे व होमगार्ड भानारकर हे वाहनांची तपासणी करत असताना एएसआय मनबत्तुलवार यांनी बॅरीकेटजवळ थांबून आरमोरीकडून गडचिरोलीकडे जाणाऱ्या पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाला टॅार्चने थांबण्याचा इशारा केला. मात्र कार चालकाने वेग कमी न करता वाहन तपासणी करत असलेल्या केवळराम येलोरे यांना जोराची धडक दिली. त्यामुळे येलोरे उसळून खाली पडले तर कार पुढे जाऊन रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली.
येलोरे यांना तत्काळ आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कार चालक मोरेश्वर वामन हेडाऊ (35 वर्ष) रा.गोकुळनगर, गडचिरोली याला न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड.निळकंठ भांडेकर यांनी कामकाज पाहिले.
































