गडचिरोली : गडचिरोली शहरात मोटारसायकलवर फिरून वेगवेगळ्या ठिकाणी गांजा विक्री करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली. सागर कवडू बावणे (25 वर्ष) रा.कोटगल ता.जि.गडचिरोली असे त्या युवकाचे नाव आहे.
आरोपी सागर हा शहरात अवैधपणे अंमली पदार्थाची विक्री करत असल्याच्या गोपनिय माहितीवरून गडचिरोली पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी शासकीय पंचांसमक्ष आरोपी सागर बावणे याच्या ताब्यातील वाहन आणि राहत्या घराची झडती घेतली. यावेळी 13 हजार 800 रुपये किमतीचा गांजा (कॅनाबिलीस) वनस्पतीची फुले, एक मोटारसायकल (अंदाजे किंमत रु.75 हजार) असा एकूण 90 हजार 800 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. (अधिक बातमी खाली वाचा)

या आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अधिक तपास पोउपनि दीपक चव्हाण करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, उपनिरीक्षक दीपक चव्हाण, पोउपनि चैतन्य काटकर व अंमलदार यांनी केली.