गडचिरोलीत 7 बेकायदेशिर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड

परिवहन विभागाची मोहीम सुरू

गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने बेकायदेशीरपणे चालणाऱ्या 7 स्कूल व्हॅनवर धडक कारवाई केली. या कारवाईत विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल व्हॅनवर एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

गडचिरोली शहरातील विविध भागांत बेकायदेशीर स्कूल व्हॅन चालत असल्याच्या तक्रारी मिळाल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तपासणी मोहीम सुरू केली. यामध्ये अनेक व्हॅनकडे आवश्यक परवाने आणि कागदपत्रे नसल्याचे आढळले. काही वाहनांमध्ये अनुमतीपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक केली जात होती, तर काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांचे दप्तर वाहनाच्या टपावर ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले.

वैध परवाना नसणे, विमा व फिटनेस कागदपत्रांची मुदत संपणे, विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक अशा अनेक मुद्द्यांवर नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळल्याने शहरातील प्रमुख रस्ते व शाळांजवळील परिसरातून त्या स्कूल व्हॅन जप्त करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिस्तबद्ध वाहतुकीला प्राधान्य- मोरे

विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर वाहतूक व्यवस्थेला मुळापासून रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. त्यासाठी तपासणी मोहीमा सुरू राहतील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी स्पष्ट केले.

शाळांना व पालकांना आवाहन

एआरटीओ मोरे यांनी सर्व शाळा व्यवस्थापन आणि व्हॅन चालकांना त्यांच्या कागदपत्रांची व वाहनांची नियमित तपासणी करून ती वैध ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पालकांनी आपल्या मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची सुरक्षा व परवाने तपासूनच ते योग्य असल्याची खात्री करण्याचेही आवाहन त्यांनी केले.