अहेरी : खर्ऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या कारला अहेरी पोलिसांनी अडवून दोन जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई गेर्रा फाट्यापासून 3 किलोमीटरवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 2 लाख 71 हजार 200 रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि 4 लाख रुपयांची मारूती कार असा एकूण 6 लाख 71 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
अहेरी पोलिसांना या सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीची माहिती खबरींमार्फत मिळाली होती. त्यानुसार नाकाबंदी करून सदर कार (क्रमांक एमएच 33, एसी 2024) अडविण्यात आली. कारची तपासणी केली असता त्यात 240 डबे मजा 108 हा सुगंधित तंबाखू होता. त्यामुळे कारमधील आरोपी सोहेल सिराज खान पठाण (रा.आलापल्ली) आणि इसरार हुसेन शेख (दुकानदार, आलापल्ली बाजारवाडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रतिबंधीत तंबाखू कुठून आणला, कोणाकडे जात होता याचा तपास पोलीस करत आहेत.
याप्रकरणी आरोपींविरोधात कलम 123, 274, 277, 278 आणि 3(5) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अहेरीचे ठाणेदार हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनात अहेरी ठाण्याच्या पथकाने केली.
































