गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मुस्का येथील मुक्तीपथ शक्तीपथ गावसंघटनेच्या महिलांनी गावातील अवैध दारूविक्री बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने महिलांनी गावातून रॅली काढून दारूविक्री बंद करण्याचे आवाहन केले होते. तरीसुद्धा चोरट्या मार्गाने दारूविक्री सुरूच होती. त्यामुळे गावातील महिला, पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने अहिंसक कृती करीत 20 लिटर दारूसह 6 ड्रम मोहसडवा नष्ट केला. याप्रकरणी गावातील दोन दारू विक्रेत्यांवर मालेवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुस्का येथे सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीच्या समस्येवर मुक्तीपथ व शक्तीपथच्या महिलांची बैठक पार पडली. यावेळी गावातील दारुसंबंधी समस्येवर चर्चा करण्यात आली. गावातील बहुसंख्य महिलांनी सहभागी होऊन अडचणी मांडल्या. पती, तरुण मुलं, सकाळी उठल्यापासून दारूचे व्यसन करतात. कमी वयातील मुलंही या आहारी जाऊन घरात भांडण करतात, शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले आहे. गावातील वातावरण बिघडले अशा अडचणी त्यांनी सांगितल्या.
यावेळी मुक्तिपथ तालुका टीमने महिलांना गावातून अवैध दारू हद्दपार करण्यासाठी सल्ला दिला. त्यानुसार नियोजन करण्याचे महिलांना सांगण्यात आले. नियोजनानुसार महिलांनी गावात दारूबंदीचे नारे देत रॅली काढली. दारू विक्रेत्याची भेट घेऊन तंबी देण्यात आली. परंतु काही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. याबाबतची माहिती मिळताच गाव संघटनेच्या महिलांनी मुक्तिपथ तालुका चमूच्या सहकार्याने अहिंसक कृती केली.
गावाला दारूविक्रीमुक्त करण्यासाठी पोलीस पाटील यांच्या नेतृत्वात महिलांनी लढा सुरु केला आहे. यावेळी गावातील शक्तिपथ संघटनेच्या महिला, मुक्तीपथ तालूका संघटक राहुल महाकुलकार, भाष्कर कड्यामी, मुक्तीपथ कार्यकर्ती बुधा पोरटे, शितल गुरनुले उपस्थित होत्या.