Home क्राईम नदीपात्रातील हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त; 34 ड्रम सडवा नष्ट

नदीपात्रातील हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त; 34 ड्रम सडवा नष्ट

अहेरी व सिरोंचा तालुक्यात कारवाया

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील बोरी आणि ओडिगुडम परिसरात वाढत्या अवैध दारू विक्रीच्या विरोधात ‘अहिंसक कृती’ करत प्राणहिता नदीच्या पात्रात लपवून ठेवलेला 34 ड्रम गुळाचा सडवा पोलीस पाटील व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या जागीच नष्ट केला.

बोरी आणि ओडिगुडम परिसरातील प्राणहिता नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू गाळून तिची विक्री केली जात होती. विशेषतः राजपूर पॅचमध्ये दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून कमी वयाच्या मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान मुक्तिपथ टीमने बोरी व ओडिगुडम गावांना भेट देऊन चर्चा केली असता ग्रामस्थांनी दारु अड्ड्यांमुळे गावावर होणारे दुष्परिणाम लक्षात आणून दिले. त्यानंतर दोन्ही गावांच्या पोलीस पाटलांच्या सक्रिय मदतीने नदी काठावर शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी झुडपांमध्ये लपवून ठेवलेला 34 ड्रम गुळाचा सडवा जागीच नष्ट करण्यात आला. या परिसरातील अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

जाफराबाद येथे गुळाचा सडवा व दारू नष्ट

सिरोंचा तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या जाफराबाद येथे मुक्तीपथ तालुका चमू आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण पाच ड्रम गुळाचा सडवा आणि 32 लिटर गुडंबा दारू हस्तगत करून नष्ट करण्यात आली. याप्रकरणी दोन अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जाफराबाद गावातून अवैध दारू पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी स्थानिक गाव संघटनेच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. असे असताना गावातील काही मुजोर दारू विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे.

गावात काही विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी गुळाचा सडवा तयार करून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याआधारे बामणी पोलीस आणि मुक्तीपथच्या तालुका चमूने संयुक्तपणे जाफराबादमध्ये शोधमोहीम राबवली. यावेळी संशयास्पद ठिकाणी तपासणी केली असता 5 ड्रम सडवा आणि दारू गाळण्याचे साहित्य मिळून आले. पथकाने हा सर्व मुद्देमाल जागीच नष्ट केला.