अहेरी पोलिसांनी पकडले दारूच्या पेट्यांनी भरलेले वाहन

2.80 लाखांची देशी दारू जप्त

अहेरी : अहेरी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बोरी परिसरात अहेरी पोलिसांनी दारूची वाहतूक करणारे एक पीकअप वाहन पकडले. त्यात 2 लाख 80 हजार रुपयांची देशी दारू होती. या कारवाईत चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातून अवैधपणे आणलेल्या या देशी दारूच्या वाहनात 90 मिली मापाच्या 3 हजार 500 निप होत्या. त्यांची किंमत 2.80 लाख असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत वाहनही जप्त करण्यात आले.

हवालदार मनोज शेंडे यांनी केलेल्या या कारवाईत वाहन चालक नितेश गुरमेट्टीवार (रा.विहिरगाव, चंद्रपूर) आणि सहकारी परशुराम वसंतराव पेंदोर (रा.आलापल्ली) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे करीत आहेत.