गडचिरोली : तेलंगणानंतर महाराष्ट्रातून नक्षलवाद्यांचे अस्तित्व संपण्याची चिन्हं दिसत असली तरी छत्तीसगडमधील अबुझमाड या भागात नक्षलवाद्यांच्या अस्तित्वाला अलिकडच्या काळापर्यंत कोणी धक्का लावू शकले नव्हते. पण आता गडचिरोली पोलिसांचा कित्ता गिरवत छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सुरक्षा दलांनीही आक्रमक भूमिका घेणे सुरू केले आहे. त्यात नक्षलवाद्यांचा गड असणाऱ्या अबुझमाडलाच सुरूंग लावण्यात आल्याने त्या भागातील नक्षली अस्तित्व धोक्यात आले आहे.
नक्षलवाद्यांसाठी सर्वाधिक सुरक्षित प्रदेश म्हणून छत्तीसगडमधील अबुझमाड भागाला ओळखले जाते. याच भागात नक्षल दलममध्ये भरती होणाऱ्या अल्पवयीन युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय त्यांचा बंदुका बनविण्याचा कारखानाही अस्तित्वात असल्याचे काही वर्षांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले होते. घनदाट जंगल आणि पहाडी भूभाग यामुळे त्या भागात सुरक्षा दलांना अभियान राबविण्यास अनेक अडचणी जात होत्या. त्याचा फायदा घेत अनेक नक्षल नेत्यांनी त्या भागात आश्रय घेतला होता.
चार-पाच वर्षापूर्वी सी-60 कमांडोंसह गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सुरक्षा दलांनी प्रथमच अबुझमाडच्या घनदाट जंगलात शिरून नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर अनेक वेळा गडचिरोली पोलिस दलाने अबुझमाडच्या जंगलात शिरून आक्रमक कारवाया केल्या. आता तोच कित्ता गिरवत छत्तीसगडमध्येही नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सुरक्षा दलांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येते. अलिकडच्या काही चकमकींमध्ये छत्तीसगडमधील सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांवर भारी पडले असून चकमकीत अनेक नक्षलवादी मारल्या गेल्याने त्यांचे मनोबल ढासळले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.