आरमोरी : युवकाशी प्रेमसंबंध ठेवल्यानंतर त्याला ब्लॅकमेल करत जवळपास 4 लाख रुपये उकळणाऱ्या आणि त्यानंतरही पैशाची मागणी करत ती पूर्ण न झाल्याने जबरदस्तीने त्या युवकाला विष पाजून आत्महत्येचा बनाव करण्याच्या कटातील तरुणीसह तिच्या दोन साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अनेक दिवसांच्या उपचारानंतर शुद्धीत आलेल्या तरुणाने या प्रकरणाचा उलगडा केल्याने तरुणीसह तिच्या सहकाऱ्यांचे बिंग फुटले. याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्या त्रिकुटाने याच पद्धतीने आणखी कोणाला फसवले का, याचीही चाचपणी केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरमोरी येथे एका 23 वर्षीय तरुणीचे एका 26 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. मात्र काही दिवसानंतर त्या तरुणीचे दुसऱ्या कोणाशी सूत जुळले असल्याची कुणकुण त्या युवकाला लागली आणि त्यांच्या प्रेमात वितुष्ट आले. त्यांच्यातील प्रेमसंबंधांचा फायदा घेत आरमोरीतील नितीन जोध आणि शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या राजू अंबानी यांनी मध्यस्थीचा बहाणा केला. पण नंतर त्या युवकाला “तुझे चॅटिंग आमच्याकडे आहे, ते व्हायरल करून तुझी बदनामी करू,” अशी धमकी देत आतापर्यंत जवळपास 4 लाख रुपये उकळले.
वारंवार पैसे मिळत असल्याने ब्लॅकमेल करणाऱ्यांची हाव वाढली आणि त्यांनी आणखी 15 लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. यादरम्यान दि.13 मार्च रोजी पीडित तरुणाला गाठत आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पिकांवर फवारणी करण्यासाठी वापरले जाणारे कीटकनाशक बळजबरीने त्याला पाजले. त्यामुळे तो तरुण बेशुद्ध पडता. त्याने आत्महत्या केली असे भासविणे आता सोपे जाईल, असा समज करत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
आत्महत्येचा बनाव, पण नशिब बलवत्तर
आरोपींनी या प्रकरणात स्वत:ला वाचवण्यासाठी पीडित युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा बनाव केला. त्यासाठी त्या युवकाच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना “बाबा मला माफ करा” असा संदेश पाठवण्यात आला. तसेच विषाच्या बाटलीचा फोटो पाठवून प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला.
विष पोटात गेल्याने तरुणाची प्रकृती गंभीर झाली होती. त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तो तरुण अखेर शुद्धीवर आला. त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. यामुळे प्रेयसी तरुणीसह ब्लॅकमेलिंगचा प्रकार करणाऱ्या दोन तरुणांचे बिंग फुटले.
पीडित तरुणाच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी त्या युवतीसह नितीन जोध आणि राजू अंबानी यांच्याविरुद्ध खंडणी आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आता या टोळीने अशाच पद्धतीने आणखी कोणाला फसवले तर नाही ना, याची चाचपणी पोलिसांकडून केली जात आहे.
तरुणीकडून लैंगिक शोषणाची तक्रार
दरम्यान आपले बिंग फुटल्याचे समजल्यानंतर या प्रकरणातील तरुणीनेही ज्या युवकावर विषप्रयोग केला त्याने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिली. त्यानुसार त्या युवकाविरूद्ध आरमोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आणखी काय-काय खुलासे पुढे येतात, याकडे आरमोरीकरांचे लक्ष लागले आहे.
































