आठ वर्षात कंत्राटदाराला 72 लाखांनी लावला चुना

सीए अविनाश भोयरला अटक

गडचिरोली : इन्कम टॅक्स, जीएसटी भरण्याची जबाबदारी विश्वासाने सोपविलेल्या सनदी लेखापालाने (सीए) संबंधित कंत्राटदाराचा विश्वासघात करत त्यांना तब्बल 72 लाख 30 हजार रुपयांनी चुना लावल्याचा गंभीर प्रकार समोर आला. यासाठी जबाबदार सीए अविनाश भोयर याला अखेर गडचिरोली पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, कंत्राटदार सुनील बट्टूवार (रा.कन्नमवार वॅार्ड, गडचिरोली) यांच्या पत्नी वैशाली यांच्या नावे मे.बालाजी इन्फ्रा हे फर्म आहे. त्या माध्यमातून ते महावितरणमधील कामांचे कंत्राट घेत असतात. व्यावसायिक उलाढाल एक कोटीपेक्षा जास्त असल्याने त्यांनी इन्कम टॅक्स आणि जीएसटी हे कर भरण्याची जबाबदारी 2018 पासून सनदी लेखापाल अविनाश भोयर याच्याकडे सोपविली होती. त्यासाठी वेळोवेळी बट्टूवार यांनी भोयर यांना पैसे दिले. 2018 ते आॅगस्ट 2025 या आठ वर्षाच्या कालावधीत भोयर यांना 72 लाख 30 हजार 431 रुपये दिले. पण भोयर याने ती रक्कम संबंधित विभागाकडे जमा न करता बट्टूवार यांना फसविले.

बट्टूवार यांना जीएसटी संदर्भात कर विभागाकडून नोटीसी आल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता त्यांनी भोयर याच्याकडे दिलेली रक्कम त्यांनी न भरता आपली फसवणूक केल्याचे बट्टूवार यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

या पद्धतीने इतरही कंत्राटदार किंवा व्यावसायिकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता असून संबंधितांनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केले आहे.