मालेवाडा परिसरातून जप्त केला 5 लाख रुपयांचा गांजा

दोन आरोपींना केली अटक

गडचिरोली : कुरखेडा उपविभागाअंतर्गत येणा­ऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीमधील धनेगाव आणि कातलवाडा येथे केलेल्या कारवाईत 50.5 किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत 5 लाख रुपये आहे. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

एलसीबीला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.अरुण फेगडे, सपोनि.समाधान दौड यांनी पोलीस पथकासह धनेगाव (ता.कुरखेडा) येथे धाड घातली. त्यात कालीदास पांडुरंग मोहुर्ले (40 वर्ष) याने त्याच्या घरी दोन चुंगळ्यांमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ (गांजा) साठवून ठेवला होता.
ओलसर गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे व बिया संलग्न असलेले कॅनबिस वनस्पती (गांजा) चे वजन 40.825 कि.ग्रॅ. होते. त्याची किंमत 4,08,250 रुपये आहे. आरोपी मोहुर्ले याने तो विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या घरामध्ये साठवून ठेवल्याचे कबूल केले.

सदर कारवाईदरम्यान पोलीस पथकास मिळालेल्या नवीन माहितीनुसार, कातलवाडा येथील तारेश्वर भुपाल चांग (34 वर्षे) याने त्याचे वडील भुपाल चांग यांच्या राहत्या घरी अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) बाळगून विक्री करीता साठवून ठेवला होता. त्या घरामध्ये एका चुंगळीमध्ये 9.678 कि.ग्रॅ. गांजा मिळून आला. त्याची किंमत 96,780 रुपये आहे.

दोन्ही आरोपींना अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास पोमकें मालेवाडाचे पोउपनि.आकाश नाईकवाडे करीत आहे.