कोरची-नवरगाव मार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार, अर्टिगा रस्त्यावरच जळून खाक

कारमधून तंबाखूची वाहतूक, चालक पसार

कोरची : नवरगाव-कोरची या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी छत्तीसगडमधुन मजा हा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या अर्टिका कारने रस्त्यालगतच्या माईलस्टोनला धडक दिली. यानंतर गाडीने पेट घेऊन ही कार पूर्णपणे जळून खाक झाली. पण गाडीत सुगंधी तंबाखू असल्याने चालकाने तेथून पळ काढला.

प्राप्त माहितीनुसार, सदर कारमधून (क्रमांक MH 35, AG7001) नियमितपणे छत्तीसगडमधून सुगंधी तंबाखूची आयात केली जात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रविवारी चालकाचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने या वाहनाने समोरून येणाऱ्या ट्रकला साईड देण्यासाठी आपली गाडी रस्त्याच्या बाजुला घेतली. पण याचवेळी ती गाडी बोटेकसा 11 कि.मी. लिहिलेल्या मैलाच्या दगडाला (माईलस्टोन) धडकली. गाडीने लगेच पेट घेतल्यानंतर चालकाने तेथून पळ काढला.

रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या गाडी जळत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी नगर पंचायतला माहिती दिली. अग्निशामक वाहनाने गाडीची आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. गाडीने पेट घेतल्यानंतर संबंधित चालकाने शक्य तितका तंबाखू गाडीतून काढून पळ काढला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र शिल्लक तंबाखूच्या डब्या जळालेल्या अवस्थेत गाडीत होत्या. त्यामुळे ही गाडी नेहमी तंबाखूची वाहतूक करत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.