निवडणुकीतील भरारी पथकांच्या मदतीला आता वन नाक्यावरील तपासणी पथके

सव्वा महिन्यात सव्वा कोटींची दारू जप्त

गडचिरोली : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील वन विभागाच्या संपूर्ण तपासणी नाक्यांवर 24 तास नाकाबंदी सुरु ठेवावी आणि दारु, अवैध रकम, आणि अंमली पदार्थाची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी वन विभागाला दिल्या.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी व निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि वन विभाग यांच्यात समन्वय राखण्याबाबत जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्ष्यतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, उपवनसंरक्षक मितेश शर्मा (गडचिरोली), राहुल टोलीया (आलापल्ली), शैलेश मीना (भामरागड), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यावेळी उपस्थित होते.

पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अंमली पदार्थविरोधी विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकामार्फत संशयास्पद व्यक्ती व मोटारी थांबवून ठिकठिकाणी नाक्यांवर तपासणी करण्यात येत आहे. आता या मोहिमेत वनविभागाच्या तपासणी नाक्यांचीही मदत होणार आहे. तपासणीदरम्यान गैरप्रकार किंवा संशयित प्रकार आढल्यास वनविभागाच्या तपासणी पथकाने नजीकच्या पोलिस स्टेशन किंवा भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

2 कोटी 20 लाखांची दारू व साहित्य जप्त

जिल्ह्यात 1 मार्चपासून आतापर्यंत वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 2 कोटी 20 लाख 50 हजार किमतीचे दारू व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात 55 हजार 285 लिटर दारू असून त्याची किंमत 95 लाख 47 हजार रुपये आहे. तसेच एक कोटी 25 लाख किमतीच्या इतर मुद्देमालाचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.