आरमोरी : पोलीस भरतीत निवड करून देण्याचे आमिष दाखवून आरमोरीत एका आदिवासी बेरोजगार युवकाची माजी नगरसेवकाने फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली. विशेष म्हणजे ही तक्रार देऊन जवळपास एक महिना पूर्ण होत आहे, मात्र अद्याप संबंधितावर कोणतीही कारवाई झालेली नाही. हे प्रकरण सध्या चौकशीत ठेवल्याचे आरमोरी पोलिसांकडून सांगण्यात आले.
अमोल बालाजी टेकाम असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. तक्रारीत नमुद केल्यानुसार टेकाम यांनी आॅक्टोबर 2023 मध्ये पोलीस भरतीसाठी फॅार्म भरला होता. त्याअनुषंगाने आरमोरी नगर परिषदेत एका पक्षाचा गटनेता असलेल्या तरुण माजी नगरसेवकाने त्यांना फोन करून आपल्या कार्यालयात बोलवले आणि पोलीस विभागात माझ्या ओळखीचे बरेच लोक आहेत, असे सांगून टेकाम यांना पोलीस भरतीत निवड होण्यासाठी 9 लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी अनामत रक्कम म्हणून 2 लाख रुपये देण्यास सांगून उर्वरित रक्कम नोकरीचा आदेश मिळाल्यानंतर देण्याचे ठरले.
पण पुढे नोकरीचा आदेश मिळालाच नसल्याने अमोल टेकाम यांनी पैसे परत मागितले. तेव्हा माजी नगरसेवकाने अनेक दिवस टाळाटाळ करून नंतर एक दिवस आपल्या दिवानजीमार्फत 25 हजार रुपये टेकाम यांना दिले. उर्वरित 1 लाख 75 हजार रुपये अद्याप दिले नसल्यामुळे अमोल टेकाम यांनी 7 आॅक्टोबरला आरमोरी पोलिसात या प्रकरणाची तक्रार दाखल केली.
आपण 5 टक्के व्याजाने पैसे आणून त्या माजी नगरसेवकाला दिले आहे. एका आदिवासी बेरोजगार युवकाची आर्थिक फसवणूक झाल्यामुळे संबंधितावर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक कैलास गवते यांना विचारले असता या प्रकरणाची तक्रार मिळाली, पण सध्या हे प्रकरण चौकशीत असल्याचे ते म्हणाले.
            































