हरवलेले आणि चोरीला गेलेले 11 लाखांचे मोबाईल शोधले

72 मोबाईल संबंधितांना सुपूर्द

गडचिरोली : जिल्ह्यात विविध ठिकाणांवरून हरवलेले आणि चोरी गेलेले 72 मोबाईल शोधून काढण्यात सायबर पोलीस ठाण्याला यश आले. 11 लाख 11 हजार 600 रुपये किमतीचे हे मोबाईल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले. सन 2025 या वर्षात आतापर्यंत सायबर पोलीस ठाण्याने 19 लाख 67 हजार 161 रुपये किमतीच्या एकूण 125 मोबाईल फोनचा शोध लावला आहे.

आजकाल तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत आहे. मोबाईल हाताळताना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर प्राप्त होणारी तक्रार संबंधित पोलीस स्टेशनमार्फत गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशनला नोंदविली जाते. मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास त्या मोबाईलद्वारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे त्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. त्यामुळे सायबर शाखेकडून तांत्रिक कौशल्याच्या आधारे सदर चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जात असतो.

‘सध्या सायबर गुन्ह्रांचे प्रमाण वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवुन फसवणुक केली जाते. मोबाईल चोरी झाला असेल तर तात्काळ ceir.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तसेच मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेऊन तात्काळ जवळच्या पोस्टे / उपपोस्टे / पोमकें, तसेच सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेच्या संपर्क साधावा. त्यामुळे आपला हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल आपल्याला परत मिळू शकतो, तसेच अज्ञातांकडून आपल्या मोबाईलचा गैरवापर केला गेल्यास आपण सुरक्षित राहतो,’ असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

मोबाईल शोधण्याची ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टेचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे, पोउपनि. नेहा हांडे, हवालदार वर्षा बहिरवार, अंमलदार संजिव लेंडगुरे, दिवाकर तनमनवार, भूषण गलगट, राहुल शिवरकर, प्रणय नाकाडे, अंकुश बोधनकर यांनी पार पाडली.