गडचिरोली : प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल येऊ लागल्याने मोबाईल हाताळताना किंवा प्रवासादरम्यान मोबाईल हरविल्याच्या किंवा चोरी जाण्याच्या घटनाही वाढत आहेत. अलिकडेच पोलिसांनी अशा 67 मोबाईलचा शोध लावला. ते मोबाईल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते संबंधित व्यक्तींकडे सुपूर्द करण्यात आले.
मोबाईल हरविल्याची किंवा चोरी गेल्याची तक्रार आल्यानंतर ती गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर शाखेकडे पाठविली जाते. मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास त्या मोबाईलच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे अशा मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. या बाबींचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशनमार्फत तांत्रिक कौशल्याचा वापर करुन हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो.
मागील वर्षी (सन 2023) एकुण 135 मोबाईलचा शोध घेण्यात आला होता. त्यांची अंदाजे किंमत एकुण 20 लाख 27 हजार रुपये एवढी होती. तसेच माहे जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 या तीन महिन्याच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या 67 मोबाईलचा शोध घेतल्यानंतर ते सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे बोलावुन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले. त्यांची अंदाजे किंमत 12 लाख रुपये आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टेचे प्रभारी अधिकारी पोनि. उल्हास भुसारी, पोउपनि. नेहा हांडे, हवालदार वर्षा बहिरवार, अंमलदार किरण रोहणकर, संजिव लेंडगुरे, दिवाकर तनमलवार यांनी पार पाडली.
सायबर गुन्हे टाळण्यासाठी सतर्क राहा
सध्या सायबर गुन्ह्रांचे प्रमाण वाढत आहे. सायबर गुन्हेगारांमार्फत लोकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवुन फसवणुक केली जाते. यासोबतच डिजीटल अरेस्टद्वारे व आर्टीफिशीयल इंटीलिजन्सच्या सहाय्याने कोणाच्याही संवेदनशिल फोटोंना एडीट करुन लोकांची फसवूणक केली जाते. त्यामुळे जनतेने सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे. आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर 1930 या नंबरवर तक्रार नोंदवावी. मोबाईल हरवला किंवा चोरी झाला असेल तर, तात्काळ पोर्टलवर किंवा प्रत्यक्ष जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले.