लैंगिक अत्याचार करताना तान्ह्या बाळाची हत्या करणाऱ्याला फाशी

अहेरीच्या सत्र न्यायालयाचा निकाल

अहेरी : वासनेचा हैवान अंगात शिरलेल्या एका तरुणाने शेजारच्या महिलेवर मध्यरात्री लैंगिक अत्याचार केला. यावेळी कुशीत झोपलेले बाळ रडत असल्याने त्याचे नाक-तोंड दाबून हत्या केली. एवढ्यारच त्याचे समाधान झाले नाही तर पीडित महिलेचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला. 19 जून 2017 रोजी केलेल्या या अत्याचाराची शिक्षा म्हणून तब्बल साडेसात वर्षानंतर त्या क्रुरकर्त्याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशी देण्याचा निर्णय घेत या प्रकरणाचा निकाल लावला. अहेरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी (दि.24) हा न्यायनिवाडा केला. (अधिक बातमी खाली वाचा)

संजू विश्वनाथ सरकार (30 वर्ष) असे फाशी झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेचा पती मजुरीसाठी आंधर प्रदेशात गेल्याची संधी साधून या आरोपीने मध्यरात्री महिलेच्या घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला. पण त्याचवेळी महिलेचे बाळ उठून रडायला लागल्याने आपल्या कुर्कमात अडथळा नको म्हणून त्याने उशिने त्याचे नाक-तोंड दाबून त्याला कायमचे शांत केले. आपल्या डोळ्यासमोर आपल्या बाळाची हत्या होत असताना ती असहाय माता क्रुरकर्म्याला रोखण्यात अपयशी झाली होती.

मुलचेरा तालुक्यातील कांचनपूरमधील या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी त्याचे घर जाळले होते. त्यानंतर जीवाच्या भितीने सरकार कुटुंबाने गाव सोडून आष्टी येथे वास्तव्य सुरू केले होते. आठ महिन्यापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली होती. आष्टीतील एका गॅरेजमध्ये काम करत असताना त्याने विवाहसुद्धा केला. पण केलेल्या पापाची सजा अखेर भोगावी लागणार असल्याने त्याचा संसार मोडल्या जाणार आहे.