गडचिरोली : देसाईगंज पोलिसांनी अवैधरित्या दारुची वाहतूक प्रकरणी १६७ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला दारूसाठा रोड रोलर फिरवून नष्ट केला. यात तब्बल १६ लाख रुपयांच्या ३७ हजार ९९४ देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांवर रोलर फिरवून तो नष्ट केल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ढिगाऱ्यात खरंच एवढ्या किमतीच्या, आणि दारूनेच भरलेल्या बाटल्या होत्या का, अशी चर्चा देसाईगंजमध्ये सुरू आहे.
१६ लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्यांवर रोलर फिरवतानाचा एक व्हिडिओ सुद्धा देसाईगंज पोलिसांनी माध्यमांसाठी पाठविला. परंतू तो व्हिडिओ पाहिल्यानंतर १६ लाखांच्या बाटल्यांचा ढिग एवढा कमी कसा? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. विशेष म्हणजे १६ लाखांच्या दारूवर रोलर फिरविल्यानंतर दारूचे पाट वाहने अपेक्षित होते. परंतू रोलरचा एक राऊड फिरविल्यानंतर केवळ चाकं ओली झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ढिगाऱ्यातील बहुतांश बाटल्या रिकाम्या तर नव्हत्या ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
देसाईगंजचे ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण रासकर, राज्य उत्पादक शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक चं.वि. भगत यांच्या देखरेखीत हा दारूसाठा नष्ट करण्यात आला. त्यामध्ये देशी दारुच्या ३६ मिली मापाच्या ३६ हजार ९५० बाटल्या, देशी दारुच्या १८० मिली मापाच्या ३१७ बाटल्या, विदेशी दारुच्या १८० मिली मापाच्या ६८० बाटल्या, ७५० मिली मापाच्या विदेशी दारुच्या १७ बाटल्या, ५०० मिली बियरच्या ३० टिनाचे कॅन अशा एकूण ३७ हजार ९९४ बाटल्यांचा यावेळी चुराडा केल्याचे देसाईगंज पोलिसांनी कळविले.
पोलिसांच्या रेकाॅर्डवर त्या ३७ हजार ९९४ बाटल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यातील काही बाटल्यांना आधीच पाय फुटले असावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे. कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया करण्यात आली.