गडचिरोली : जादुटोणा करत असल्यामुळे मुलांचा मृत्यू होत असल्याचा संशय घेत बार्सेवाडा गावातील एका महिलेसह पुरूषाला बेदम मारहाण करत जीवंत पेटवून जीवानिशी मारण्याची घटना उघडकीस आली. एटापल्ली तालुक्यातल्या बार्सेवाडा या गावात 1 मे रोजी रात्री घडलेल्या या घटनेची वाच्यता झाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी (दि.3) गावातील 15 लोकांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या घटनेची पार्श्वभूमी अशी की, बार्सेवाडा गावातील जननी देवाजी तेलामी (52 वर्ष) आणि देवू कटया आतलामी (60 वर्ष) हे गावातील लोकांवर जादुटोणा करतात असा गावकऱ्यांचा संशय होता. हे दोघेही वेगवेगळ्या कुटुंबातील असून ते पुजारी म्हणून काम करीत होते. दरम्यान जवळच्या बोलेपल्ली गावातील एका महिलेचा गर्भपात झाला. महिनाभरापूर्वी एका बालिकेचा मृत्यू झाला. त्याच कुटुंबातील एका दीड वर्षाच्या मुलीचाही 1 मे रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसाठी जननी आणि देवू यांचा जादुटोणा कारणीभूत असल्याचा संशय बळावला. गावकऱ्यांमध्ये हा चर्चेचा विषय झाला. त्यातूनच दोघांनाही संपवण्याचा कट शिजला. काही लोकांनी जननी आणि देवू यांचे घर गाठून त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर दोघांनाही गावाजवळच्या नाल्यात नेऊन जाळले. त्यात पूर्णपणे जळून दोघांचाही मृत्यू झाला.
दि.2 ला या घटनेची चर्चा पसरल्यानंतर मृत जननीच्या वासामुंडी येथील भावाने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत तपास सुरू केला. दरम्यान अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्लीचे पोलिस निरीक्षक नीळकंठ कुकडे, एपीआय शिंदे, उपनिरीक्षक नागरगोजे, उपनिरीक्षक म्हेत्रे, गिरवलकर व अंमलदारांनी अवघ्या काही तासात 15 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना दि.3 ला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.