गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या शिरपूर खरेदी केंद्राअंतर्गत देऊळगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या खरेदी केंद्रात दोन वर्षात झालेल्या 10 हजार क्विंटल धान अपहाराचे कोडे अद्याप सुटलेले नाही. जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी पोलीस कारवाई करण्याचे आदेश टीडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. मात्र दुसरीकडे टीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक (नाशिक) लिना बन्सोड यांनी पोलीस कारवाईसाठी अद्याप ‘ग्रीन सिग्नल’ दिलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी अद्याप पोलीस तक्रार होऊ शकलेली नाही.
टीडीसीच्या (आदिवासी विकास महामंडळ) प्रादेशिक व्यवस्थापकांच्या तपासणीत सदर घान घोटाळा उघडकीस आला आहे. या अपहारासाठी कुरखेडा येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपव्यवस्थापकांनीच प्रोत्साहन दिल्याचा गंभीर आरोप देऊळगाव सोसायटीच्या व्यवस्थापकांनी केला होता.
दरम्यान जिल्हाधिकारी तथा धान भरडाई समन्वय समितीचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना दिले होते. त्यानुसार प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संबारे यांनी केलेल्या तपासणीत देऊळगाव केंद्रावर हंगाम 2023-24 आणि हंगाम 2024-25 मध्ये 10 हजार क्विंटल धानाची तफावत आढळून आली. दरम्यान हा घोळ झाल्याची कबुली किंवा तो कोणाच्या सांगण्यावरून केला याची माहिती देऊळगाव आविका संस्थेच्या व्यवस्थापकाने आपल्या खुलास्यात केली आहे. त्यामुळे कुरखेडाचे उपप्रादेशिक व्यवस्थापकही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
एमडींचा घोटाळेबाजांबाबत ‘सॅाफ्ट कॅार्नर’?
आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) लिना बन्सोड यांनी 9 एप्रिल रोजी कुरखेडाचे उपव्यवस्थापक मुरलीधर बावणे यांना या घोटाळ्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली. त्याचे उत्तर दोन दिवसात द्या, अन्यथा आपले काहीही म्हणने नाही, असे गृहित धरून आपल्याविरूद्ध पुढील कारवाई केली जाईल, असे त्या नोटीसमध्ये नमूद केले होते. मात्र प्रत्यक्षात नोटीस बजावून सहा दिवस झाले तरीही एमडी लिना बन्सोड यांनी बावणे यांच्यावर कोणतीही कारवाई प्रस्तावित केलेली नाही. यासंदर्भात त्यांना विचारले असता, मी नोटीस बजावली आहे. ते खुलासा सादर करतील, त्यानंतर काय कारवाई करायची ते ठरविले जाईल, असे त्यांनी मोबाईलवर बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे एमडींच्या मनात उपव्यवस्थापकांबद्दल सॅाफ्ट कॅार्नर तर नाही ना, आणि असेल तर तो कशामुळे? अशा शंका घेण्यास वाव मिळत आहेत.
दुसरीकडे याप्रकरणी अद्याप एफआयआर दाखल केला नसल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी टीडीसीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.