धानोरा : तालुक्यातील सिंदेसूर या गावातील एका महिलेला खांबाला बांधून आणि अंगावरील वस्त्रं फाडून बांबूच्या काठीने मारहाण करणाऱ्या पाच जणांना धानोरा न्यायालयाने एक वर्षांचा सश्रम कारावास आणि दंड ठोठावला आहे. यातील आरोपींमध्ये चार महिला आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मुरमगाव पोलीस स्टेशनअंतर्गत सिंदेसूर येथे 12 मार्च 2020 रोजी पीडित महिला दुलोबाई फत्तेसिंग धुर्वा हिला आरोपी लिलाबाई बिसाऊ गोटा, सोबराज अलीयारसिंग मडावी, कोलीबाई सोबराज मडावी, लालतीबाई धनीराम गावडे व रगोतीबाई सोबराज मडावी यांनी विद्युत खांबाला बांधून, तसेच अंगावरील वस्त्रे फाडून बांबूच्या काठीने मारहाण केली.
यासंदर्भात दुलोबाईने दुसऱ्या दिवशी तोंडी तक्रार दिल्यानंतर संबंधित आरोपींवर कलम 324, 341, 354 (ब), 34 भादविंनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अंजली मेवासिंग राजपूत यांनी पाचही आरोपींना दिनांक 14/03/2020 रोजी अटक न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केला होता. साक्षीदारांचे बयान व वैद्यकिय पुरावा तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्र धरुन पाचही आरोपींना प्रथम श्रेणी न्यायाधीश श्रीमती एन.ए. पठाण यांनी एक वर्ष सश्रम कारावास, एक वर्ष साधा कारावास, दोन महिने साधा कारावास अशी कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 15,000/- प्रमाणे एकूण 75,000/- हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा एकाचवेळेस भोगायची आहे, अशी तरतुद करण्यात आली आहे.
सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील बी. के. खोब्राागडे यांनी कामकाज पाहिले.