72 लाखांचा दंड वाचविण्यासाठी आरएफओने घेतली पाच लाखांची लाच

पेरमिलीचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली : अहेरी तालुक्यातल्या पेरमिली क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांना तब्बल ५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ग्रामीण भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी अनधिकृतपणे मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडून जेनेकर यांनी ७२ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तो ५ लाख रुपयापर्यंत कमी करण्यासाठी जेनेकर याने ५ लाख रुपयांची लाच स्वीकारली.

प्राप्त माहितीनुसार, मौजा तुमरगुंडा ते कासमपल्ली रस्त्याच्या कामावर मुरूमाचा पुरवठा करणाऱ्या ट्रॅक्टरला आरएफओ प्रमोद जेनेकर यांनी पकडून ७२ लाखांचा दंड ठोठावला. पण हा दंड ५ लाखावर आणायचा असेल तर १० लाख रुपयाची लाच द्यावी लागेल अशी अट त्यांनी टाकली. यामुळे संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. दरम्यान तडजोडीअंती जेनेकर याने ५ लाखांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले.

एसीबीच्या उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले यांनी तक्रारीची शहानिशा केली. त्यानुसार गुरूवारी संध्याकाळी लावलेल्या सापळ्यात आरएफओ जेनेकर याला ५ लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

यावेळी एसीबीच्या पथकाने शासकीय निवासस्थानी घेतलेल्या झडतीत आणखी ८५ हजार रुपये घरात आढळले. ती रक्कमही जप्त करण्यात आली. या कारवाईत एएसआय सुनील पेद्दीवार, नायक किशोर जौजारकर, शिपाई संदीप घोरमोडे, संदीप उडान, चालक हवालदार नरेश कस्तुरवार यांनी सहकार्य केले.