गडचिरोलीत दुकाने फोडणारी अल्पवयीन मुलांची टोळी ताब्यात

चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत

गडचिरोली : शहरात मागील आठवड्यात चामोर्शी रोड, धानोरा रोड आणि चंद्रपूर रोडवरील व्यापाऱ्यांच्या दुकानांचे शटर लॉक तोडून चोरी करणाऱ्या टोळीने व्यापाऱ्यांसह पोलिसांचीही झोप उडविली होती. अखेर त्या टोळीला पकडण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे त्या टोळीतील सदस्य सराईत गुन्हेगार नसून अल्पवयीन मुले आहेत. इतक्या कमी वयात ती मुले घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यात गुंतल्याचे पाहून पोलीसही चक्रावले आहेत.

गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या आठवड्यात सलग झालेल्या तीन दुकानांमधील चोऱ्यानंतर दि.19 जून 2025 रोजी पोलिसानी भा.न्या.सं.कलम 305 (अ), 331 (4) अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन स्टाफच्या अधिकारी व अंमलदारांनी शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून, रात्रगस्तही वाढवली होती. (अधिक बातमी खाली वाचा)

दरम्यान सीसीटीव्हीतील फुटेजच्या मदतीने पोलिसांनी त्या चोरट्यांचा शोध लावत 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्या अल्पवयीन मुलांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेकरिता बाल न्यायमंडळ गडचिरोली यांच्यासमोर हजर केले जाणार आहे.

ही कारवाई बालकल्याण पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशनमार्फत करण्यात आली. सदर गुन्ह्राचा तपास पोलीस स्टेशनचे हवालदार दिलीप खोब्रागडे करत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान), एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्यसाई कार्तिक, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि.विनोद चव्हाण, डिटेक्शन पथकातील पोलीस अंमलदार/धनंजय चौधरी, स्वप्निल कुडावले, स्वदिप मेश्राम, तुषार खोब्राागडे, अतुल भैसारे यांनी पार पाडली.