देऊळगाव सोसायटीच्या धान खरेदीत 2 वर्षात 10 हजार क्विंटलचा अपहार

उपव्यवस्थापकानेच दिली अक्कल?

गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या शिरपूर खरेदी केंद्राअंतर्गत देऊळगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडून गेल्या दोन हंगामात मिळून जवळपास 10 हजार क्विंटल धानात अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. प्रादेशिक व्यवस्थापकांच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे या अपहारासाठी कुरखेडा येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपव्यवस्थापकांनीच प्रवृत्त केल्याची गंभीर बाब समोर येत आहे. तुम्ही मी सांगतो तसे करा, बाकी मी पाहून घेतो, असे म्हणत उपव्यवस्थापकांनी या अपहाराला पाठबळ दिल्याचे देऊळगाव सोसायटीच्या व्यवस्थापकांनी आपल्या खुलाशात स्पष्ट केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या अपहाराची कुणकुण लागल्यानंतर जिल्हाधिकारी तथा धान भरडाई समन्वय समितीचे अध्यक्ष अविश्यांत पंडा या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना दिले होते. त्यानुसार प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संबारे यांनी केलेल्या तपासणीत देऊळगाव खरेदी केंद्रावर हंगाम 2023-24 आणि हंगाम 2024-25 मध्ये धान खरेदी आणि साठा यात जवळपास 10 हजार क्विंटल धानाची तफावत आढळून आली.

याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार संबंधितांवर लवकरच फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे. याशिवाय अपहार झालेल्या धानाच्या रकमेची वसुली करण्यासाठी दोषींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले.

उपप्रादेशिक व्यवस्थापकांवर ठपका

याप्रकरणी देऊळगाव आ.वि.कार्य.सह.संस्थेच्या व्यवस्थापकाने आपली बाजु मांडताना या सर्व प्रकारासाठी कुरखेडाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांना जबाबदार धरले आहे. त्यांच्या सांगण्यांनुसारच मी शेतकऱ्यांच्या नावाने धानाचे पैसे काढले. माझे नाशिकमधील एमडी सोबत घरगुती संबंध आहेत. त्यामुळे मी सांगतो तसे कर. तुला काही होणार नाही. मला वरिष्ठांना, संचालकांना पैसे द्यावे लागतात असे म्हणून आपल्याला उपव्यवस्थापकांनी वेळोवेळी पैशाची मागणी केली, असेही देऊळगाव केंद्राच्या व्यवस्थापकांनी म्हटले आहे.