अंमली पदार्थाची तस्करी आणि सेवन करणाऱ्यांवर कारवाई

6 महिन्यात 2 लाखांचा गांजा जप्त

गडचिरोली : जिल्ह्रात अवैध प्रकारे अंमली पदार्थांची तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार दि.26 रोजी गडचिरोली शहरातील व ग्रामीण भागात अंमली पदार्थ विक्री करणारे, सेवन करणारे यांच्याविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनाच्या निमित्ताने ही मोहीम उघडण्यात आली. जानेवारी ते जून या सहा महिन्यात गडचिरोली पोलिसांनी 2 लाखांचे अंमली पदार्थ (गांजा) जप्त केला आहे.

मागील आठवड्यामध्ये गडचिरोली पोलीस स्टेशनला एनडीपीएस कायदा-1985 अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे, अवैधपणे विक्री करणारे, गांजाचा पुरवठा करणारे इसम यांचा शोध घेण्यात आला. दि.17 एप्रिल 2025 रोजी इंदिरानगर चेक पोस्टजवळ दुचाकीवरून वाहून नेला जात असलेला 9500 रुपयांचा 472 ग्राम गांजा पकडण्यात आला होता. त्यावेळी पळून गेलेल्या आरोपीचा सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने शोध घेण्यात आला असता, तो 17 वर्षीय अल्पवयीन बालक असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याने अंमली पदार्थांचा पुरवठा करणारा इसम वनमाळी लहानु जेंगठे (46 वर्षे, रा.कोसरी ता.आरमोरी) याच्याबद्दल माहिती दिली. पोलीस पथकाने वनमाळी याच्या घराची झडती घेतली असता, 1 किलो 4 ग्राम गांजा जप्त करण्यात आला. तसेच त्याला अटक करण्यात आली. (अधिक बातमी खाली वाचा)

दि.19 मे रोजी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी हा फरार होता. गडचिरोली पो.स्टे.चे अधिकारी व अंमलदारांनी आपल्या तपास कौशल्याचा वापर करुन संशयीत आरोपी बालाजी अंबादास रामटेके (रा.साखरा ता.गडचिरोली) यालाही अटक केली आहे.

सहा महिन्यात 5 गुन्हे, 7 आरोपींवर कारवाई

पोलीस स्टेशन गडचिरोली येथे सन 2025 मध्ये अवैधपणे गांजा विक्री प्रकरणी एकूण 5 गुन्हे दाखल झाले असून यामध्ये 7 आरोपींवर कारवाई करून, एकूण दोन लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ (गांजा) जप्त केला आहे. तसेच अंमली पदार्थ सेवन करणा­ऱ्या दोन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण, सपोनि. शरद मेश्राम, पोउनि.चैतन्य काटकर, माधुरी मिसाळ, अश्विनी पाटील, दीपक चव्हाण, दीपक मोहिते, पोअं. धनंजय चौधरी, स्वप्निल कुडावले, नरेश मेश्राम, स्वदीप मेश्राम, तुषार खोब्रागडे, राजेंद्र पुरी, ताजुद्दीन गोवर्धन, अतुल भैसारे, मनोज कन्नाके, फोटोग्राफर पिदूरकर, संतोष नादरगे यांनी पार पाडली.