गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेने ग्रामीण भागात देशी दारूचा पुरवठा करणारा एक ट्रक पकडून त्यातील तब्बल 52 लाखांची दारू आणि आणि 15 लाखांचा ट्रक असा एकूण 67 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात दोन आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई कुरखेडा तालुक्यातील पुराडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली.
आरोपी जितेंद्र शंकर लोहार, हल्ली मु.येंगलखेडा, ता.कुरखेडा हा आपला सहकारी रोशन दुग्गा, रा.चिचेवाडा, ता.कुरखेडा याच्या मदतीने चारचाकी वाहनाने (क्र.एमएच-18-बी.झेड-7477) पुराडामार्गे अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतूक करणार आहे, अशी गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरुन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हेटीनगर, पुराडा चौक येथे सापळा रचला. पोलीस पथकाने ते वाहन थांबवून तपासणी केली असता, त्या वाहनात 85 पेट्या टँगो पंच देशी दारुचे बॉक्स (किंमत अंदाजे 6,80,000 रुपये) आणि 565 पेट्या रॉकेट देशी दारुचे बॉक्स (किंमत अंदाजे 45,20,000 रुपये) आढळले. याशिवाय चारचाकी आयशर वाहन (अंदाजे 15,00,000 रुपये), दोन जुने मोबाईल (किंमत अंदाजे 20,000 रुपये) असा एकूण 67 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सपोनि रविंद्र म्हैसकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. तसेच कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स.पो.नि. समाधान दौड, पुराडाचे सपोनि रविंद्र म्हैसकर स्थागुशाचे हवालदार सुधाकर दंडीकवार, अंमलदार प्रशांत गरफडे, रोहित गोंगले, अंमलदार माणिक निसार यांनी पार पाडली.