खर्रा विक्रेत्यांवर कारवाईसाठी गडचिरोली पोलिसांचा पुढाकार

'एफडीए' मात्र अजूनही झोपेतच

गडचिरोली : गडचिरोली शहरातील पानठेले चालकांकडून अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ (खर्रा) विक्री केल्याप्रकरणी चार पानठेले चालकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ‘कटाक्ष’ने याकडे लक्ष वेधल्यानंतर पोलिसांनी त्याच दिवशी ही कारवाई केली. मात्र सुगंधीत तंबाखूच्या वापराविरूद्ध कारवाई करण्याची हिंमत अद्याप अन्न प्रशासन विभागाने दाखवलेली नाही. त्यामुळे यामागचे गुपित काय? असा प्रश्न कायम आहे.

खुलेआम सुरू असलेल्या सुगंधीत तंबाखूविक्री प्रकरणी काही कारवाई करणार आहे का? असा प्रश्न अन्न प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना विचारल्यानंतर त्यांनी सोयीस्करपणे मौन बाळगत मॅसेजला उत्तर देणे टाळले. यावरून कुठेतरी पाणी मुरत असल्याचे स्पष्ट होत आहे. हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासन कोणती समज देणार, हेच आता पहावे लागेल.

दरम्यान गडचिरोली पोलिसांनी इंदिरा गांधी चौकातील चार पानठेल्यांवर कारवाई करत त्यांच्याकडील खर्रा बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. याप्रकरणी सुनील केशव बावनवाडे रा.गोकुलनगर, मंगेश देवराव कन्नाके रा.हनुमान वॅार्ड, संजय केशवराव केवटकर रा.रामपुरी वॅार्ड आणि राजू उष्टू भोयर रा.माळी मोहल्ला अशी गुन्हा दाखल झालेल्या चार पानठेला चालकांची नावे आहेत. हे विक्रेते 18 वर्षाखालील मुलांना खर्रा विक्री करताना आढळले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पो.निरीक्षक विजय मुसनवार, हवालदार श्यामराव अंकल यांनी केली.