कुरखेडा : जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी दिनांक कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या मालेवाडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील मौजा दामेश्वर येथे अंमली पदार्थविरोधी कारवाई केली आहे. यात स्वत:च्या शेतामध्ये गांजा पिकवून तो विक्रीसाठी घरात ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत 28 किलो गांजा जप्त करण्यात आला.

मालेवाडा पोलिसांना गोपनिय बातमीदारांकडून दामेश्वर येथील इसमाच्या घरी गांजा साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजपत्रित अधिकारी म्हणून कोरची ठाण्याचे पोनि.शैलेद्र ठाकरे, तसेच पोमकें मालेवाडाचे पोउपनि.अभिजीत पायघन आणि त्यांच्या पथकाने दामेश्वर येथे जाऊन मोहन यशवंत कोवाची (42 वर्ष) याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली. यावेळी त्याच्या घरामध्ये चार पिवळसर पांढया, हिरवट, करड्या रंगाच्या चुंगळ्यांमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ (गांजा) मिळून आला.
सदर चुंगळ्यांची पंचासमक्ष तपासणी केली असता, दोन रेघट हिरवट रंगाच्या पिशवीमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे व बिया संलग्न असलेले कॅनबिस ही अंमली पदार्थ असलेली वनस्पती (निव्वळ गांजा 28.050 कि.ग्रॅ.) आढळला. त्याची किंमत 1 लाख 12 हजार 240 रुपये आहे.
आरोपीकडे सदर अंमली पदार्थाबाबत अधिक विचारणा केली असता, त्याने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या शेतामध्ये सदर अंमली पदार्थ उगवला असल्याचे कबूल केले. यावरुन आरोपी मोहन कोवाची याच्याविरुध्द पोलीस स्टेशन पुराडा येथे मंगळवारी (दि.20) गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तो अंमली पदार्थ (गांजा) जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोमकें मालेवाडाचे पोउपनि.अभिजीत पायघन करीत आहे.
ही कारवाई कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरचीचे पोनि. शैलेंद्र ठाकरे, पोमकें मालेवाडाचे प्रभारी अधिकारी पोउपनि.आकाश नाईकवाडे, पोउपनि.अभिजित पायघन, पोहवा. मडकाम, म्हशाखेत्री, नायक हुंडरा, अंमलदार साजन मेश्राम यांनी पार पाडली.