आरमोरी : चोर तर चोर, वरून शिरजोर, असा काहीसा प्रकार आरमोरीत स्वातंत्र्यदिनी घडला. पण सीसीटीव्ही फुटेजमुळे खरा प्रकार स्पष्ट होऊन फिर्यादीच आरोपी असल्याचे दिसून आले. त्यामुळे क्षुल्लक कारणासाठी एका रेस्टॅारंटच्या काऊंटरवर बसलेल्या युवतीला मारहाण करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पण त्याला अटक करण्यात आली नाही. या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, येथील वडसा टी-पॅाईंट जवळच्या शिवम् रेस्टॅारंटमध्ये स्वातंत्र्य दिनी सोहेल शेख, रा.बर्डी आणि अजुब शेख, रा.कासार मोहल्ला, आरमोरी तसेच सोहेलची पत्नी हे दोसा खाण्यासाठी आले होते. काही वेळानंतर पत्नीला तिथेच ठेवून सोहेल व त्याचा मित्र काही कामानिमित्त बाहेर गेले. यादरम्यान सोहेलच्या पत्नीने रेस्टॅारंटच्या काऊंटरवर बसलेल्या युवतीला मोबाईल चार्जर मागितला. पण मालकाच्या निर्देशानुसार कोणाला चार्जर देता येत नसल्याचे तिने सांगितले. यावरून दोघींमध्ये वाद झाला. त्यामुळे सोहेलच्या पत्नीने फोन करून त्याला बोलवले. सोहेलने आल्यानंतर काऊंटरवरील युवतीचे केस पकडून तिचे डोके काऊंटवर आपटले. एवढेच नाही तर जबर मारहाण केली. यानंतर स्वत:च पोलिसांना फोन करून युवतीविरोधात तक्रार केली. मात्र रेस्टॅारंट मालकाने पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दाखविले, त्यात खरा प्रकार समोर आला.
युवतीच्या तक्रारीवरून सोहेल व त्याच्या मित्राविरोधात मारहाण, विनयभंग, अश्लील शिवीगाळीचा गुन्हा दाखल केला. मात्र कालपर्यंत त्याला अटक झालेली नव्हती.