नक्षलवाद्यांच्या भामरागड दलम कमांडरचे सपत्निक आत्मसमर्पण, 10 लाखांचे इनाम

नक्षलविरोधी अभियानाला महत्वपूर्ण यश

गडचिरोली : जिल्ह्यातून नक्षल चळवळ हद्दपार करण्याच्या लढ्यात सोमवारी पोलीस दलाला महत्वाचे यश मिळाले. छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात सक्रिय असलेल्या भामरागड दलमचा नक्षल कमांडर वरुण राजा मुचाकी आणि त्याची पत्नी रोशनी यांनी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकासमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून दोघांवर मिळून 10 लाखांचे ईनाम शासनाने ठेवले होते. नक्षल चळवळीचे भवितव्य अंध:कारमय असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी यातून बाहेर पडण्यासाठी आत्मसमर्पणाचा मार्ग अवलंबिल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम, ऊर्फ रेंगु (27 वर्ष) हा भामरागड दलममध्ये कमांडर पदार कार्यरत होता. तो मुळचा छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पिडमिली या गावातील रहिवासी आहे. त्याची पत्नी रोशनी विज्या वाचामी (24 वर्ष) ही भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. ती भामरागड तालुक्यातल्या मल्लमपोड्डूर या गावातील रहिवासी आहे. नक्षल चळवळीत असतानाच त्यांनी विवाह केला होता, पण चळवळीत राहून वैवाहिक जीवन जगता येत नव्हते. चळवळीत भ्रमनिरास झाल्याने अखेर त्यांनी शांततेने आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.

वरुण राजा मुचाकी याने सन 2015 ते 2020 पर्यंत डीकेएसझेडसी गिरीधर तुमरेटी याचा अंगरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. नोव्हेंबर 2020 ते 2022 दरम्यान तो भामरागड दलममध्ये उपकमांडर पदावर कार्यरत होता. सन 2022 ते आजपावेतो त्याच्यावर भामरागड दलममध्ये दलम कमांडर पदाची जबाबदारी होती. त्याच्यावर 10 चकमकीचे आणि 5 इतर गुन्हे आहेत. त्याच्यावर शासनाने 8 लाखांचे इनाम ठेवले होते.

रोशनी ही 2015 मध्ये राही दलममध्ये भरती झाली होती. सन 2016 मध्ये तिची भामरागड दलममध्ये बदली झाली. 2017 मध्ये अहेरी दलममध्ये आणि 2019 मध्ये पुन्हा भामरागड दलममध्ये तिची बदली झाली. त्यानंतर सन 2021 मध्ये गट्टा दलममध्ये आणि 2022 मध्ये परत भामरागड दलममध्ये बदली होऊन आजपर्यंत पार्टी मेंबर पदावर कार्यरत होती. तिच्यावर 13 चकमकी आणि इतर 10 गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने 2 लाखांचे इनाम ठेवले होते.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडून या नक्षल दाम्पत्याला एकुण 11.5 लाख रुपयांचे बक्षीस शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 यादरम्यान एकुण 27 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ 37 बटालियनचे कमांण्डंट दाओ इंजिरकान किंडो यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली.

जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास ईच्छुक असतील त्यांना लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्विकारावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.