खुनाचे आठ गुन्हे दाखल असलेल्या जहाल नक्षलवाद्याचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

शासनाने ठेवले होते 6 लाखांचे इनाम

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या टेक्निकल टिमचा पश्चिम सब झोनल ब्युरो केदार उर्फ मन्या किंजो नैताम (42 वर्ष) याने शुक्रवारी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण करणारा केदार 2002 पासून नक्षल चळवळीत सक्रिय होता. त्याच्यावर खुनाचे तब्बल 8 गुन्हे दाखल आहेत. पोलिस दलासोबत झालेल्या विविध चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. या जहाल नक्षलवाद्यावर राज्य शासनाने 6 लाखांचे इनाम ठेवले होते.

मुळचा धानोरा तालुक्यातील कोसमी नं.1 येथील रहिवासी असलेल्या केदार याने टिपागड दलम, टेक्निकल टिम उत्तर विभाग, टिपागड एरिया प्लाटून 15 आणि टेक्निकल टिम पश्चिम सब झोनल ब्युरो अशा विविध ठिकाणी काम केले आहे. पण नक्षली जीवनाला कंटाळून अखेर त्याने शांततेने जगण्याचा मार्ग पत्करला.

त्याच्यावर चकमकीचे 18 गुन्हे, जाळपोळीचे 2, खुनाचे 8 आणि इतर 6 असे एकूण 34 गुन्हे दाखल आहेत. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून केदार ऊर्फ मन्या नैताम याला एकूण 4.5 लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

गडचिरोली पोलीस दलाने प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे, तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 या अडीच वर्षात एकूण 25 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. केदार याचे आत्मसमर्पण घडवून आणण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक (अभियान) अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफचे कमांडंट जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विश्वंभर कराळे, प्रभारी अधिकारी (पोमके) सावरगाव यांनी विशेष पुढाकार घेतला.