गडचिरोली : जिल्हा पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या संयुक्त कारवाईत मंगळवारी एका जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात यश आले. मेस्सो गिल्लू कवडो असे त्याचे नाव असून तो नक्षलवाद्यांच्या पुरवठा विभागात एरिया कमिटी मेंबर (एसीएम) म्हणून कार्यरत होता. चार दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांच्या एका उपकमांडरला अटक करण्यात आली होती. मेस्सो कवडो याच्यावर नक्षलवाद्यांना विविध स्फोटक साहित्याचा पुरवठा करणे, तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे आदी आरोपीखाली गुन्हे दाखल आहेत. याशिवाय चकमक, खून, जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचेही गुन्हे त्याच्यावर आहेत. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर सहा लाख रुपयांचे बक्षिस ठेवले होते.
तो जाजावंडी-दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून विशेष अभियान पथकासह सीआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांनी त्याला अटक केली. चार दिवसांत दोघांना अटक केल्याने नक्षलवाद्यांच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेडरीचे एसडीपीओ बापुराव दडस आणि सीआरपीएफ ई/191 बटालीयनचे असिस्टंट कमांडन्ट मोहीत कुमार यांच्या नेतृत्वात पार पडली.