गडचिरोली : पोलिसांनी शनिवारच्या पहाटे छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील जारावंडी पोलिसांच्या हद्दीत अटक केलेल्या जहाल नक्षलवादी चैनुराम उर्फ सुक्कू वत्ते कोरसा (48) याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. नक्षलवाद्यांना विविध साहित्य पुरवठा करण्यासोबत स्फोटक पदार्थांचाही पुरवठा तो करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. नक्षल्यांच्या पुरवठा विभागात त्याच्यावर उपकमांडर म्हणून जबाबदारी होती. त्याच्या अटकेमुळे भविष्यातील अनेक घातपाती कारवाया रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
छत्तीसगडच्या कांकेर सिमेलगत असलेल्या जारावंडी आणि पेंढरी या दोन्ही पोलिस स्टेशनच्या परिसरात घातपात करण्याच्या उद्देशाने तो हेटळणी करण्यासाठी येणार असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे मौजा जारावंडी ते सोहगाव जाणाऱ्या मार्गावरील कुरमावडा फाट्याजवळ विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्याच्यावर पाळत ठेवून नक्षलविरोधी अभियान राबविले. त्यात चैनुरामला पोलिसांच्या हाती लागला.
चैनुराम हा मूळचा छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील टेक्कामेटा येथील रहिवासी आहे. सन 2000 मध्ये तो नक्षलवाद्यांच्या पर्लकोटा दलममध्ये भरती झाला होता. वेळोवेळी बढती होऊन आता तो नक्षलवाद्यांच्या पुरवठा विभागात डीव्हीसीएम, अर्थात उपकमांडर म्हणून कार्यरत होता. त्याची बहुतांश कारकिर्द महाराष्ट्राच्या हद्दीत झाली आहे. 2020 मध्ये मौजा पोयारकोठी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत त्याचा सहभाग होता. या चकमकीत एका पोलिस उपनिरीक्षकासह सी-60 कमांडो शहीद झाला होता. याशिवाय इतर सहा अशा एकूण सात चकमकी आणि अॅम्बुशमध्ये त्याचा सहभाग होता. एवढेच नाही तर छत्तीसगडमध्येही त्याने एका निरपराध नागरिकाची हत्या केली आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर 16 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
चैनुराम याने नक्षलवाद्यांना कोणकोणत्या साहित्याचा पुरवठा, कुठून केला, यात त्याला कोणी सहकार्य केले अशा अनेक गोष्टी आता बाहेर येण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दुपारी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे (अभियान), कुमार चिंता (प्रशासन), यतिश देशमुख (अहेरी उपमुख्यालय) हेसुद्धा उपस्थित होते.
जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 71 नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलाला यश आले आहे.