गडचिरोली : मोठ्या शहरांमध्ये नशेत वाहन चालवून धडक देऊन पळण्याचे प्रकार अलिकडे वाढले असताना गडचिरोलीतही शनिवारी असाच काहीसा प्रकार घडला. आरमोरी मार्गावर एका भरधाव दुचाकीस्वाराने दुसऱ्या एका दुचाकीला धडक देऊन पळ काढला. यात धडक बसलेल्या दुचाकीवरील महिला जखमी झाली. यावेळी तिच्यासोबत असलेला दीर आणि दोन मुले थोडक्यात बचावली.
प्राप्त माहितीनुसार, नवरगांव (कुनघाडा) येथील सरस्वती बोलीवार यांचे पती संदीप बोलीवार हे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. त्यामुळे सरस्वती बोलीवार पतीच्या देखभालीसाठी गडचिरोलीत आल्या होत्या. त्यांचा दीर संतोष त्यांना एमएच 33, ए.एफ. 6219 क्रमांकाच्या दुचाकीने आरमोरी मार्गावरून जात होता. दरम्यान सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास रस्त्यातून येणाऱ्या एका भरधाव दुचाकीने बोलीवार यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात सरस्वती व त्यांची दोन मुले आयुष आणि आयुषा रस्त्यावर फेकल्या गेले. पण धडक देणारा दुचाकीस्वार तिथे न थांबता पळून गेला.
या प्रकाराने जखमी सरस्वती यांना आणखीच घबराट सुटली. त्यांचे दीर संतोष मदतीसाठी याचना करत असल्याचे पाहून देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा.अनिल धामोडे यांनी वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम सोडून तिकडे मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी महिलेला तात्काळ आपल्या वाहनातून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांनी अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश साळुंके यांनाही अपघाताची माहिती दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त सरस्वती यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.