देसाईगंज : देसाईगंज पोलिसांनी 2018 ते 2024 या कालावधीत दारूबंदी कायद्यानुसार दाखल केलेल्या 520 गुन्ह्यांमधील जप्त दारूच्या बाटल्या रोड-रोलरखाली चिरडून त्या नष्ट करण्यात आल्या. या दारूची किंमत 61 लाख 77 हजार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कारवार्इंदरम्यान जप्त केलेला माल जागेअभावी दीर्घकाळ जतन करुन ठेवणे अडचणीचे ठरत असते. यामुळे तो न्यायालय व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीने दि.28 रोजी नष्ट करण्यात आला. यावेळी देसाईगंज ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्यासह राज्य उत्पादक शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक चंदन भगत व शु.के.चौधरी उपस्थित होते.
नष्ट केलेल्या मुद्देमालात विदेशी दारुच्या 180 मिलीच्या 2666 बॉटल, विदेशी दारुची 2 लिटर क्षमतेची 1 बॉटल, विदेशी दारुच्या 1000 मिलीच्या 6 बॉटल, विदेशी दारुच्या 90 मिली मापाच्या 62 बॉटल, विदेशी दारुच्या 375 मिली मापाच्या 7 बॉटल, देशी दारुच्या 180 मिलीच्या 28 बॉटल, देशी दारुच्या 90 मिलीच्या 10 हजार 1015 बॉटल, 650 मिली बिअरच्या 29 बॉटल, 500 मिली मापाच्या बिअरच्या 245 टिन कॅन, 330 मिली मापाच्या बियरच्या 48 बॉटल याप्रमाणे एकुण 61 लाख 77 हजार 330 रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. रोलरच्या सहाय्याने काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्यांचा चुराडा करून दोन पंचांसमक्ष 15 बाय 15 फुटाच्या खोल खड्ड्यात तो चुराडा भरून तो खड्डा बुजविण्यात आला.