गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरित्या दारुची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशान्वये सातत्याने कारवाया केल्या जात असतात. त्यानुसार जप्त मुद्देमाल जागेअभावी दीर्घकाळापासून जतन करून ठेवणे अडचणीचे ठरत असल्याने देसाईगंज पोलिसांनी तो रोड रोलरखाली चिरडून नष्ट केला. त्यात सन 2023 ते 2025 या कालावधीतील दाखल 372 गुन्हयांमधील 19 लाख 67 हजार रुपयांच्या देशी-विदेशी दारूचा समावेश होता.
न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) देसाईगंज यांच्या परवानगीने देसाईगंजचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक शुभम चौधरी यांच्यासमक्ष ही कार्यवाही करण्यात आली. नष्ट केलेल्या मालात विदेशी दारुच्या 180 मिलीच्या 402 नग बॉटल, विदेशी दारुच्या 2 लिटर मापाच्या 12 नग प्लास्टिक बॉटल, विदेशी दारुच्या 90 मिलीच्या 110 नग बॉटल, देशी दारु 180 मिली मापाच्या 4 बॉटल, देशी दारू 90 मिलीच्या 20,916 नग बॉटल, 500 मिली मापाच्या बिअरच्या 82 टिन कॅन, 300 मिली मापाच्या बियरच्या 7 नग बॉटल, याप्रमाणे एकुण 19 लाख 67 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जेसीबी व रोड रोलरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आला.
काचेचा चुरा व प्लास्टीकच्या चेपलेल्या बॉटल जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यात टाकून खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्येमालाची विल्हेवाट लावताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.
ही कारवाई कुरखेडाचे एसडीपीओ रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंजचे प्रभारी अधिकारी पोनि. अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोउपनि. दुर्योधन सरपे, पोहवा. राजेंद्र मोहुर्ले, अंमलदार शैलेश तोरपकरवार, चिंतामण पिल्लारे, मिनाक्षी तोडासे, श्रध्दाप्रिया वंजारी यांनी पार पाडली.
































