महिला उपनिरीक्षकांसोबत हातापायी करणाऱ्या दारू विक्रेत्या महिलांना शिक्षा

जिल्हा व सत्र न्यायाधिशांचा न्यायनिवाडा

गडचिरोली : देसाईगंजच्या गांधी वार्डातील आपल्या घरातून अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या महिलेच्या घराची झडती घेण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकासोबत हातापायी करण्याचा प्रकार 27 आॅक्टोबर 2021 रोजी घडला होता. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत दोन आरोपी महिलांना दोन महिन्यांचा कारावास आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी सुनावली.

प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज ठाण्या्च्या तत्कालीन पो.उपनिरीक्षक सोनम नाईक यांच्या नेतृत्वात पो.उपनिरीक्षक सुजाता भोपळे आणि पोलिस ठाण्याचे पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना देसाईगंजच्या गांधी वार्डातील रजनी रामचंद्र आत्राम (47 वर्षे) या दारू विक्रेत्या महिलेच्या घरी पंचांसमक्ष धाड टाकून झडती घेण्यासाठी गेले. यावेळी शितल रामचंद्र आत्राम (26 वर्षे) हिने माझ्या आईला दोन मुली पोसायच्या आहेत म्हणून माझी आई दारु विकते, हे माझे घर आहे, तुमचे पोलिस स्टेशन नाही, असे म्हणून एकाएकी पो.उपनिरीक्षक सोनम नाईक यांना मारहाण सुरू केली. यावेळी पो.उपनिरीक्षक सुजाता भोपळे यांनी आरोपीला रोखले. पोलिस पथक व पंचांनी आरोपींना समजाविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आरडाओरड करुन अश्लिल शब्दात शिवीगाळ केली.

याप्रकरणी दोन्ही महिला आरोपींना कलम 353, 332, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करुन दुसऱ्या दिवशी अटक केली. फिर्यादी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर यांनी दोन्ही आरोपींना कलम 353, 34 भादंवि मध्ये दोषी ठरवून शिक्षा सुनावली. यात सरकार पक्षातर्फे सहा.जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्राचा प्रथम तपास सपोनि राजेश गावडे यांनी केला.