गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील वालसरा या गावातील भाजप पदाधिकाऱ्यावर अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत घरातून 45 पेट्या दारू (किंमत 3 लाख 60 हजार रुपये) जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे चामोर्शी तालुका उपाध्यक्ष रामचंद्र केशव भांडेकर यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. रामचंद्र हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांचे बंधू आणि माजी महिला जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांचे दीर आहे. (अधिक बातमी खाली वाचा)
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे हा छापा टाकला. रामचंद्र हा सयाबाई भांडेकर यांच्या नावे असलेल्या घरातून दारू विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी पहाटे पथकाने सयाबाई भांडेकर यांच्या घरी छापा टाकला. त्यावेळी रामचंद्र हा तिथेच होता. भांडेकर याने घरझडती घेण्यास नकार दिला. त्यामुळे पंचांसमक्ष पथकाने झडती घेतली असता घराच्या पहिल्या खोलीत रॅाकेट देशी दारू संत्रा कंपनीचे 45 खरड्याचे बॅाक्स आढळले. त्याची अवैध विक्री किंमत 3 लाख 60 हजार रुपये आहे.
रामचंद्र भांडेकर हे अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय करत होते, की आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी हा दारूसाठा करून ठेवलेला होता याचा तपास चामोर्शी पोलीस करत आहेत. भाजपसारख्या नितीवान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपदी विराजमान पदाधिकाऱ्याच्या भावाने, तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेल्या पदाधिकाऱ्याच्या दीराने अशा भानगडीत पडावे याबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणाची भाजपकडून दखल घेतली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
































