दुचाकीच्या पेट्रोल टाकीत कप्पा, अंगावरच्या जॅकेटमध्ये 90 निपा

दारू आणण्यासाठी अशीही शक्कल

गडचिरोली : दारुबंदी असताना छुप्या पद्धतीने शेजारच्या जिल्ह्यातून विक्रीसाठी दारू आणताना लोक वेगवेगळी शक्कल लढवतात. अशाच एका बहाद्दराने चक्क दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीत कप्पा बनवून त्यात दारूच्या बॅाटल्स भरून आणत होता. तर दुसऱ्या घटनेत एक महिला थंडीचा फायदा घेत अंगावरच्या जॅकेटला आतून खिसे बनवून त्यात चक्क 90 बॅाटल्स भरून आणत असताना पोलिसांच्या नजरेस पडली.

सध्या नगर परिषद निवडणुकीमुळे गडचिरोली ठाण्याकडून सहा नाक्यांवर स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आले आहेत. या पथकाकडून पारडी नाका येथे संशयित वाहनांची तपासणी केली जात असताना नदीपलिकडून गडचिरोलीकडे येत असलेल्या एका संशयित दुचाकी वाहन चालकास थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. असता एमएच 34, ए एक्स 9809 या दुचाकीच्या पेट्रोल टाकीमध्ये छुप्या पद्धतीने दारूच्या बाटल्या भरलेल्या आढळल्या. दोन पंचांसमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, सदर दुचाकी वाहनाच्या पेट्रोल टाकीमध्ये 180 मिली मापाच्या रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की कंपनीच्या 40 नग सिलबंद बॉटल आढळल्या. त्यामुळे दुचाकी वाहनासह त्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच वाहन चालक तानाजी नानाजी पेंदोरकर (34 वर्षे) रा. हैदराबाद (तेलंगणा), हल्ली मु.व्याहाड (बु.) याला अटक करण्यात आली.

यासोबतच चंद्रपूरवरून गडचिरोलीकडे येणा­या एस.टी. बसमधील प्रवाशांची तपासणी केली असता एक वयस्कर महिला अंगावर स्टोल पांघरुन घेऊन संशयितरित्या बसलेली दिसून आली. ललीता सुधाकर महामंढरे (65 वर्षे) रा.रामपुरी, ता.आरमोरी, हल्ली मु.रामनगर वार्ड क्र.19, गडचिरोली या महिलेने आपल्या अंगात घातलेल्या जॅकेटमध्ये देशी दारुच्या 90 निपा लपवल्या होत्या. तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्रांचा पुढील तपास पोउपनि. शिवाजी देशमुख व मपोउपनि.पुजा नैताम करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.