गडचिरोली : अहेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मद्दीगुडम येथे अवैधरित्या साठवून ठेवलेली आणि वाहतुकीसाठी नेण्याच्या तयारीत असलेली 730 पेट्या देशी दारू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. या कारवाईत 58 लाखांच्या दारूसह स्कॅार्पिओ वाहन असा एकूण 73 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
पोलीस सूत्रानुसार, बुधवारी (दि.1) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, मद्दीगुडम (ता.अहेरी) येथील काही इसमांनी अवैधरित्या विक्रीकरीता देशी दारुची साठवणूक करून ठेवलेली असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस पथकाने दोन पंचांसमक्ष त्या ठिकाणी धाड टाकली असता, घटनास्थळावर देशी दारुच्या पेट्या विक्रीकरीता घेऊन जाण्यासाठी एका स्कॉर्पिओ वाहनात भरुन ठेवल्या असल्याचे दिसून आले. यावेळी पोलीस पथकाने मिथुन विश्वास मडावी (35 वर्षे), रा.आलापल्ली याला यास वाहनासह ताब्यात घेतले, मात्र पोलीस पथक आल्याचा सुगावा लागल्याने इतर तीन आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यांचा शोध सुरु आहे. या गुन्ह्राचा पुढील तपास अहेरी ठाण्याचे सपोनि.देवेंद्र पटले करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व इतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि.भगतसिंग दुलत, अंमलदार राजू पंचफुलीवार व चालक अंमलदार दीपक लोणारे यांनी पार पाडली.